महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत' विशेष : आरोग्य यंत्रणेची ऑक्सिजनसाठी दमछाक; बीडमध्ये दररोज 800 सिलेंडर्सची गरज - बीड कोरोना अपडेट

कोरोना सुरू होण्यापूर्वी केवळ 90 ते 100 ऑक्सिजन सिलेंडरर्सची आवश्यकता भासत होती. मात्र आता परिस्थिती बिकट झालीय. सध्या दररोज 800-900 ऑक्सिजन सिलेंडरची गरज भासत असल्याने सरकारी रुग्णालयासोबतच खासगी रुग्णालयांची ऑक्सिजन सिलेंडर मिळवण्यासाठी दमछाक होत आहे.

corona in beed
'ईटीव्ही भारत' विशेष : आरोग्य यंत्रणेची ऑक्सिजनसाठी दमछाक; बीडमध्ये दररोज 800 सिलेंडर्सची गरज

By

Published : Sep 14, 2020, 2:14 PM IST

बीड - दिवसेंदिवस झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यातील ऑक्सिजनची गरज वाढली आहे. कोरोना सुरू होण्यापूर्वी केवळ 90 ते 100 ऑक्सिजन सिलेंडरर्सची आवश्यकता भासत होती. मात्र आता परिस्थिती बिकट झालीय. सध्या दररोज 800-900 ऑक्सिजन सिलेंडरची गरज भासत असल्याने सरकारी रुग्णालयासोबतच खासगी रुग्णालयांची ऑक्सिजन सिलेंडर मिळवण्यासाठी दमछाक होत आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार दीड हजार ऑक्सिजन बेड तयार असले, तरी ऑक्सिजन आणायचा कुठून हा प्रश्न कायम आहे. यावर पर्याय म्हणून येत्या 15 दिवसांत ऑक्सिजन निर्मितीचे चार प्रकल्प बीड जिल्ह्यात सुरू करणार असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक एकनाथ माले यांनी दिली आहे.

'ईटीव्ही भारत' विशेष : आरोग्य यंत्रणेची ऑक्सिजनसाठी दमछाक; बीडमध्ये दररोज 800 सिलेंडर्सची गरज
संपूर्ण जिल्ह्यात 6 हजार 494 कोरोना पॉझिटिव्ह आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. हायर एक असलेल्या एका रुग्णाला एका मिनिटाला 80 ते 90 क्यूब लिटर पर्यंत ऑक्सिजन द्यावा लागतो. हे प्रमाण लक्षात घेता दर दिवशी बीडमध्ये 400 रुग्ण ऑक्सिजनवर असतात. यामुळे दररोज 700 ते 800 ऑक्सिजन सिलेंडरर्सची गरज भासत आहे. सरकारी रुग्णालयांप्रमाणेच खासगी रुग्णालयांना देखील ऑक्सिजन मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे खासगी कोविड सेंटरचे डॉ.यशवंतराजे भोसले यांनी सांगितले. कोरोनाच्या रुग्णांना इतर रुग्णांच्या तुलनेत ऑक्सिजनची मात्रा जास्त घ्यावी लागते. सध्या कोरोनाच्या रुग्णाला ऑक्सिजन देण्याची वेळ आल्यास किमान पाच लिटर प्रति मिनिट या वेगाने ऑक्सिजन द्यावा लागतो. 80 लिटर प्रति मिनिट सुद्धा ऑक्सिजन वाढवावा लागत असल्याचे डॉक्टर राजेभोसले म्हणाले.बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाला पूर्वी लातूरमधून ऑक्सिजन पुरवठा होत होता. मात्र लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ऑक्सिजन पुरवठ्याला जिल्हाबंदी घातली. त्यामुळे आता रुग्णालयाला बीडमधूनच ऑक्सिजन पुरवठा होत आहे. बीड जिल्ह्यात चाकण प्रकल्पातून ऑक्सिजन आणण्यात येत असल्याचे विकास ऑक्सिजन प्रकल्पाचे प्रमुख संभाजी जोगदंड यांनी सांगितले. मागील दोन महिन्यापासून बीडमध्ये ऑक्सिजन सिलेंडरची मागणी वाढली आहे. वाढती मागणी लक्षात घेता आम्ही ऑक्सिजन पुरवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे संभाजी जोगदंड यांनी सांगितले.बीड जिल्ह्यातील लोखंडे सावरगाव येथील कोविड सेंटरमध्ये सध्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला असून त्यातून रोज 83 ते 85 सिलेंडर ऑक्सिजन तयार होत आहे. तर बीड येथील दोन खासगी प्रकल्पातबन सध्या जिल्ह्याची गरज भागवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र यावर पडणारा ताण लक्षात घेऊन आता आणखी चार ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचेही आरोग्य उपसंचालक डॉक्टर एकनाथ माले म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details