बीड: जिल्ह्यातील 1394 गावांपैकी 656 लहान-मोठ्या गावात स्मशानभूमीची सोय नसल्यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्काराच्या वेळी मृतदेहाची हेळसांड होत असते. स्मशानभूमीची सुद्धा दुरावस्था झाली असून अंत्यसंस्कार दरम्यान काही गावांतील ग्रामस्थांमध्ये वादविवाद होऊन सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन आंदोलने सुद्धा करण्यात आली. आता एका सामाजिक कार्यकर्त्याने सरण रचून आंदोलन केले. हे आंदोलन 12 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव, ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री यांना निवेदन दिले होते; पण त्यावर काही कारवाई झाली नाही.
स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी आंदोलने; पण..:बीड जिल्ह्यातील अस्तित्वात असलेल्या स्मशानभूमीची दुरावस्था झाली असून शेडचे पत्रे उडून गेले आहेत. बांधकाम पडलेले, अतिक्रमणामुळे रस्त्याची सोय नाही. आदी कारणांमुळे ग्रामस्थांमध्ये वादाचे प्रसंग घडून मृतदेह तहसील कार्यालयात आणण्याच्या दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. वरील प्रकरणात डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली 11 नोव्हेंबर 2022 रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. ज्ञानेश्वर मोकाटे यांनी जिल्ह्यात स्मशानभूमी बांधकामाची आवश्यकता असल्याचे सांगत आंदोलन केले होते.