महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वृक्ष संवर्धनातून वातावरणातील ऑक्सिजन वाढविण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचा पुढाकार

सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता ऑक्सिजनचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढावे यासाठी अंबाजोगाई तालुक्यातील भतानवाडी गावात एका तरुण सामाजिक कार्यकर्त्याने पुढाकार घेतला आहे.

By

Published : May 3, 2021, 9:08 AM IST

Ambajogai social worker tree conservation news
अंबाजोगाई वृक्ष संवर्धन बातमी

बीड - अंबाजोगाई तालुक्यातील भतानवाडी ग्रामपंचायतीने कोणत्याही शासकीय निधी आणि मदतीविना ४ हजार वृक्षांचे रोपन, संगोपन व संवर्धन केले आहे. स्वखर्चाने पर्यावरण संवर्धन करून जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींसमोर या गावाने नविन आदर्श ठेवला आहे. भविष्यासाठी वातावरणातील नैसर्गिक ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी गावातील प्रयोगशील तरुण सामाजिक कार्यकर्ता ज्ञानदेव भताने यांनी पुढाकार घेतला आहे.

ऑक्सिजन वाढविण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याने पुढाकार घेतला

हजारो झाडांची लागवड -

गावाचा कायापालट करण्याचे नुसते स्वप्न पाहून जमत नाही तर, त्यासाठी गावक-यांचे संघटन, जबाबदाऱ्यांचे वाटप आणि नेमके काय करायला हवे हे लक्षात आले पाहिजे. भविष्यासाठी वातावरणातील नैसर्गिक ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी भतानवाडी गावातील ज्ञानदेव भताने यांनी २०१९ पासून पुढाकार घेतलेला आहे. त्यासाठी त्यांनी ग्रामस्थांना वेळोवेळी वृक्ष संगोपनाचे महत्त्व पटवून दिले. त्यात त्यांना यश आले व ग्रामस्थांना सोबत घेऊन जुलै २०१९ मध्ये भतानवाडी येथील गायरान जमिनीवर लिंब (१ हजार १५०), करंज (१ हजार ६३०), शिसव (४५०), आवळा (४१०), सिताफळ (२००), चिंच (७०), रामफळ (५०), वड (20), पिंपळ (२०), अशी एकूण तब्बल ४ हजार झाडांची लागवड केली. यासाठी तत्कालीन वनमंञी सुधीर मुनगंटीवार यांनी राबवलेल्या योजनेंतर्गत अंबाजोगाई येथील वनविभागाचे तत्कालीन अधिकारी वरूडे, नागरगोजे तसेच परळी येथील गित्ते, सामाजिक वनीकरणचे मोहीते यांनी ज्ञानदेव यांना रोपे उपलब्ध करून दिली होती. तर, यातील ५६ चिंचाची रोपे ही रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई यांनी भेट दिली आहेत. आज ही सर्व झाडे दीड ते दोन वर्षे वयाची असून अंदाजे ६ ते ७ फुट उंचीची झालेली आहेत.

सर्व गावकऱ्यांचे सहकार्य मिळते -

वृक्ष जगविण्यासाठी पाणीपुरवठा, खड्डे खोदने, खुरपणी, खत देणे, पाण्याची मोटार, पाईपलाईन, वीज बील, मजुरांचा पगार, वाहतूक, आदी बाबींवर भतानवाडी ग्रामपंचायतीने स्वनिधीतून ६ ते ७ लाख रूपयांपेक्षा जास्त खर्च केला आहे. या सर्व वृक्षांच्या संगोपनासाठी ज्ञानदेव भताने यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच आहेत. यापूर्वी विठ्ठलराव भताने यांच्या मार्गदर्शनाखाली २०१६ पासून पाणी फौंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत आणि मागील वर्षी समृध्द गाव स्पर्धेत पाञ असलेल्या २८ गावांमध्ये भतानवाडीचा समावेश झाला होता. मागील वर्षांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे ही स्पर्धा पुर्ण होवू शकली नाही. तसेच राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत देखील भतानवाडीने उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. यासाठी सर्वच गावक-यांचे मोठे योगदान लाभत असल्याचे ज्ञानदेव भताने यांनी सांगितले.

वृक्षारोपण, संवर्धन आणि संगोपनासाठी अंबाजोगाई तालुक्यातील भतानवाडी सारख्या प्रत्येक ग्रामपंचायतीने पुढे यावे. याकामी शासन व प्रशासनाने ज्ञानदेव भताने यांच्या सारख्या पर्यावरण संवर्धनाचे काम करणा-या तरुणांना प्रोत्साहित केले पाहिजे. महाराष्ट्रातील गाव-खेड्यात खरेच हिरवाई आणायची असेल तर वृक्ष लागवड मोहिमेत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. गेल्या काही दशकांमध्ये देशासह राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्याला माणसांकडून मोठ्या प्रमाणात केली जाणारी वृक्षतोड कारणीभूत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण हे अनिवार्य आहे. वृक्षारोपनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी वॉटरकप स्पर्धेच्या धर्तीवर रोख रकमेचे बक्षीस देणारी स्पर्धा सुरू करावी. ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाडे जगविणा-या ग्रामपंचायती, संस्था व व्यक्तींना बक्षीसपाञ समजावे, असे मत ज्ञानदेव भताने यांनी व्यक्त केले.

कोविडमुळे समजली ऑक्सिजनची किंमत -

दररोज आपल्या कुटुंबातील, नात्यातील, मिञ परिवारातील अनेकजण कोरोनाने बाधित होत आहेत. अशा काळात काही रूग्णांची ऑक्सिजन लेवल कमी झाली, ऑक्सिजन सिलेंडर पाहिजे, ऑक्सिजन प्लांट कधी कार्यान्वित होईल, असे काहीसे शब्द ऐकावयास मिळत आहेत. एकिकडे ऑक्सिजनसाठी हजारो रूपये खर्च करण्यासाठी लोक तयार आहेत. तर, दुसरीकडे हजारो वर्षांपासून वृक्ष आपल्याला अगदी मोफत ऑक्सिजन पुरवत आहेत. या स्थितीवरून मानवी जीवनातील ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात येत आहे. त्यामुळे केवळ सरकारला दोष देत बसण्यापेक्षा प्रत्येकाने वृक्षारोपण व त्याचे संगोपन करावे. आपण हे केले तर पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल. वातावरणातील नैसर्गिक ऑक्सिजन वाढून तो पुढील पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल, असे ज्ञानदेव भताने म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details