परळी (बीड) - येथील बंजारा समाजाची युवती पूजा चव्हाण हिने पुण्यात आत्महत्या केली. यानंतर सोशल मिडीयावर उलटसुलट चर्चा सुरू झाली. दरम्यान, पूजाच्या मृत्यूनंतर तिच्या आई, वडीलांनी प्रतिक्रिया दिली आहे. "माझा कोणावरही संशय नाही. सोशल मीडियावरील आमची बदनामी थांबवावी," असे पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी म्हटले आहे.
पूजा माझी मुलगी नव्हती तर तो मुलगा होता-
अद्यापही पूजाच्या मृत्यूची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. यासंदर्भात पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी माध्यमांजवळ मन मोकळे करताना सांगितले, की पूजा माझी मुलगी नव्हती तर तो मुलगा होता. ती अत्यंत धाडसी होती. पूजाच्या नावावर पोल्ट्रीफार्म सुरू करण्यासाठी बँकेकडून कर्ज काढले आहे. पण गेल्या दोन वर्षांपासून हा व्यवसाय पूर्ण तोट्यात आहे. याचा ताण पूजाला येत होता. तसेच पूजा सतत आजारी असायची याचाही ताण तिला येत होता. मी तिला तू ताण घेऊ नको सर्व काही व्यवस्थित होईल, असे सांगत होतो.
माध्यमांनी आमची बदनामी थांबवावी-
पण पुण्यात जाऊन तिने बहुतेक याच कारणामुळे आत्महत्या केली आहे, असे वाटते. दुसरे कोणतेही कारण नाही. फक्त माध्यमांनी आमची बदनामी थांबवावी, असे आवाहन लहू चव्हाण यांनी केले आहे. चौकशी मधून काय पुढे यायचे ते येईल. आमचा न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे. आमचा समाज आमच्यापाठीशी आहे, असे लहू चव्हाण यांनी सांगितले.
मृत्यूची चौकशी शासकीय यंत्रणेमार्फत करावी-
तर पूजाचे आजोबा यांनी बोलताना सांगितले की, पूजा २०-२५ दिवसांपूर्वी येवून भेटून गेली. तिच्या मृत्यूची चौकशी शासकीय यंत्रणेमार्फत करावी, अशी मागणी केली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: विरोधक सत्ताधारी आमने-सामने
दरम्यान, या आत्महत्या प्रकरणासंदर्भात नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणाशी संजय राठोड यांटा थेट संबंध असल्याचा उल्लेख भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे प्रकरणानंतर संजय राठोड यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. बंजारा समाजाचे नेते आणि माजी आमदार हरिभाऊ राठोड म्हणाले, याबाबत काय बोलायचं आपलेच दात आणि आपलेच ओठ आहेत. या सगळ्या प्रकरणाची चौकशी पुणे पोलिसांकडून सुरू आहे आणि या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केल आहे. त्यामुळे मी यावर अधिक भाष्य करणार नाही. माझा संजय राठोड यांच्याशी संपर्क झालेला नाही. जर माझा संपर्क झाला तर मी त्यांना या प्रकरणासंदर्भात विचारणा करेल, अशी माहिती त्यांनी सांगितली.
अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा दाखल करा, परळी पोलिसात तक्रार दाखल-
पूजा चव्हाण प्रकरणांमध्ये विरोधी पक्षाकडून भूमिका मांडत असलेले अतुल भातखळकर यांच्याविरोधात बंजारा समाजाच्या वतीने तक्रार करण्यात आली आहे. बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी तसेच अश्लील व जातिवाचक शब्दाचा वापर करत माध्यमांवर बदनामीकारक माहिती दिल्यामुळे भाजप नेते अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बंजारा समाजाच्या वतीने परळी या ठिकाणी करण्यात आली. परळी पोलीस स्टेशनमध्ये बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अतुल भातखळकर यांच्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे.