बीड - शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय काही महिलांनी नारीशक्ती महिला संस्थेच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याची किमाया साधली आहे. बीडमधील सहा महिलांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या प्रकारचे कपडे शिलाई उत्पादन तयार केले. यामध्ये पंजाबी ड्रेस, मास्क, परकर यासारख्या वस्तू उत्पादित केल्या. यामुळे कोरोना नंतरच्या बिकट परिस्थितीत समाजातील गोरगरीब 50 महिलांच्या हाताला काम मिळाले. शिवाय नारीशक्ती संस्थेचे मोठे काम देखील उभे राहिले असल्याचे, नारी शक्ति संस्थेच्या सदस्य शालिनी परदेशी आणि ललिता तांबारे या मोठ्या अभिमानाने सांगतात.
लॉकडाऊनमुळे कुटुंबांवर आले होते संकट -
शालिनी परदेशी, ललिता तांबारे, निता कांबळे, शीतल जाधव, संगीता कोकीळ व दिपाली वंजारे या सहा मैत्रिणींनी विचार करत एकत्र येऊन दोन वर्षापुर्वी बीडमध्ये नारीशक्ती महिला संस्था स्थापन केली. त्यानंतर गेल्या वर्षभरात कोरोनाचे संकट आले. या काळात अनेक महिलांच्या हातातील काम गेले. परिणामी अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. अशा बिकट परिस्थितीत गोरगरीब महिला शालिनी परदेशी यांच्याकडे काही काम आहे का? म्हणून काम मागायच्या, तेव्हा या गोरगरीब महिलांना काय काम द्यावे, हा प्रश्न त्यांच्यासमोर असायचा. शालिनी परदेशी आणि त्यांच्या मैत्रिणींनी कपडे शिवण्याचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. शिलाई मशीन घेऊन ज्या वस्तूंना बाजारात जास्त मागणी आहे, त्या वस्तू बनवायच्या असे ठरले. त्यासाठी शिलाई मशीन आणायच्या कुठून? असा प्रश्न निर्माण झाला. मात्र समाजातील काही व्यक्ती चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी कायम उभ्या राहतात. मुंबई येथील आनंद मार्ग प्रचारक संघ यांच्याकडून नारी शक्ति महिला औद्योगिक संस्थेला 25 शिलाई मशीन मोफत देण्यात आल्या. या मदतीवर नारी शक्ती संस्थेचे काम जोमात सुरू झाल्याचे शालिनी परदेशी यांनी सांगितले.