बीड- मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आता सरकार काय भूमिका घेणार हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, अन्यथा आता मराठा समाज शांत बसणार नाही. सरकारमधील मंत्र्यांची होत असलेली पोपटपंची बंद करून आम्हाला तत्काळ सरकारने न्याय द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना दिले आहे.
याबाबत गुरुवारी बीडमध्ये एक बैठक देखील झाली. या बैठकीत येत्या आठवड्यात आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा मोर्चा काढण्याचे नियोजन केले असल्याचेही आमदार मेटे म्हणाले.
16 मे ला बीडमध्ये मोर्चा
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर समाजावर होणाऱ्या अन्यायाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. याचाच भाग म्हणून बीडमध्ये येत्या 16 मे रोजी मोर्चा काढण्याचे नियोजन मराठा समाज बांधवांनी केले आहे. शुक्रवारी शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी याबाबत या आंदोलनाचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना शुक्रवारी निवेदन देऊन थेट मुख्यमंत्र्यांनीच मराठा आरक्षणाच्या संदर्भात हे सरकार काय निर्णय घेणार आहे. याचा खुलासा करावा, आतापर्यंत सरकारमधील मंत्री करत असलेली पोपटपंची थांबवून आम्हाला आमच्या हक्काच्या आरक्षणाबाबत न्याय देण्याच्या दृष्टीने हे सरकार काय भूमिका घेणार आहे. हे सांगावे, असे म्हटले आहे.
सोशल डिस्टन्स पाळून आंदोलन करू-
या सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजावर अन्याय होत आहे. याविरोधात आम्ही सबंध राज्यभरात आंदोलन उभे करणार आहोत. सध्या कोरोनाची बिकट परिस्थिती आहे. अशा वेळी सोशल डिस्टन चा नियम पाळून आम्ही बीड जिल्ह्यात आंदोलन करणार आहोत. याशिवाय 16 मे रोजी मोर्चा देखील काढणार असल्याचे आमदार मेटे यांनी सांगितले.