बीड -मातीच्या अस्तित्वावरच मानवाचे अस्तित्व अवलंबून आहे. माती जिवंत राहिली तरच माणसे जिवंत राहू शकतील. हा विचार घेऊन बीडच्या एका तरुणाने वयाच्या 21 व्या वर्षी सेंद्रिय शेतीमध्ये काम सुरू केले. शेतकऱ्यांच्या शेतातील शेणाच्या उकिरड्यावरून सुरू झालेल्या बीडच्या या तरुणाचा प्रवास आजही सुरू आहे. गाईच्या शेणापासून तसेच इतर कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिती करत ऑरगॅनिक कृषी व्यवसायाला त्याने चालना दिली. एवढेच नाही तर जगभरातील 7 देशांमध्ये बीडच्या गांडूळ खताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील 5 लाख शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीच्या तंत्रज्ञानाचे त्याने प्रशिक्षण दिले. सध्या बीड जिल्ह्यात 40 हजार शेतकरी ऑरगॅनिक शेतीचे प्रयोग करण्यासाठी या तरुणाच्या सोबत सरसावले आहेत.
ही यशोगाथा आहे, बीड जिल्ह्यातील लोळदगाव येथील कृषिभूषण शिवराम घोडके यांची. लोळदगाव येथे बळीराजा कृषी विज्ञान मंडळ अंतर्गत सेंद्रिय शेती तसेच 'फार्मर फ्रेंड ऑरगॅनिक प्रोड्यूसर' कंपनी च्या माध्यमातून सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या शेतीमालावर विशेष प्रक्रिया केली जात आहे. 2002-03 या वर्षी शिवराम घोडके यांनी परभणी विद्यापीठातून बीएससी अॅग्रीकल्चरची पदवी घेतली त्यानंतर त्यांनी एखाद्या अॅग्रिकल्चर कंपनीमध्ये नोकरी करावी, अशी घरच्या लोकांची इच्छा होती. मात्र, शिवराम यांनी नोकरी न करता कृषी क्षेत्रात इतरांपेक्षा वेगळे काम करण्याचा निश्चय केला. सेंद्रिय शेतीसाठी लागणारे गांडूळ खत तयार करण्याचे काम त्यांनी हाती घेतले. सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांच्या शेतावरील शेणाच्या उकिरड्यावर गांडूळखत निर्मितीचे काम सुरू केले. त्यांचे हे काम पाहून गावातील लोक शिवराम घोडके यांच्या वडिलांजवळ म्हणायचे की, 'तुमचा मुलगा एवढा बी एस्सी शिकला तरी देखील लोकांच्या उकिरड्यावर का फिरतोय?' त्यांना तुच्छतेने पहायचे. मात्र, समाज काय म्हणतो याकडे लक्ष न देता शिवराम यांनी त्यांचे काम सुरू ठेवले. त्यांच्या कामातील सातत्य व सेंद्रिय शेतीचा असलेला अभ्यास पाहून महाराष्ट्र सरकारने 2010 साली शिवराम घोडके यांना कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित केले.
स्वतःच्या 20 एकर शेतीपासून केली सुरुवात -
बीड जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना ऑरगॅनिक शेतीचे महत्व लक्षात यावे, यासाठी शिवराम घोडके यांनी सर्वप्रथम स्वतःची 20 एकर शेती ऑरगॅनिक म्हणजेच सेंद्रिय खतापासून पिकवली. या सेंद्रिय शेती करण्याला सुरुवातीला शिवराम घोडके यांच्या घरातून देखील विरोध झाला. रासायनिक खत शेतीला दिले नाही तर शेती पिकणार कशी? अशी धारणा शिवराम यांच्या घरच्यांची देखील होती. मात्र, त्यांनी मोठ्या कष्टातून रासायनिक खता ऐवजी गांडूळ खत वापरून शेती करता येऊ शकते, हे सिद्ध करून दाखवले. सेंद्रिय शेतीमध्ये शिवराम यांनी केलेले प्रयोग पाहण्यासाठी दूरवरून शेतकरी त्यांच्या शेतीवर येऊ लागले.
हजारो शेतकऱ्यांना दिले प्रशिक्षण -
कृषी विभागाने देखील त्यांच्या कामाची दखल घेतली. लोळदगाव येथेच त्यांच्या शेतात बळीराजा कृषी विज्ञान मंडळाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यामध्ये प्रशासनाने शिवराम घोडके यांना मदत केली. एवढेच नाही तर महाराष्ट्रातील पाच लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत लोळदगाव येथे सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण शिवराम यांनी दिले आहे. यापैकी चाळीस हजाराहून अधिक शेतकरी हे बीड जिल्ह्यातील असून सेंद्रिय शेतीचे वेगवेगळे प्रयोग बीड जिल्ह्यात सुरू आहेत. शिवराम घोडके यांच्या स्वतःच्या 20 एकर शेतीमध्ये ऊस, हरभरा, ज्वारी, सह इतर पिकांना रासायनिक खत न देता गांडूळ खत दिले जात असल्याचे ते अभिमानाने सांगतात.