बीड - शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्ते मोठ्या प्रमाणात उखडले आहेत. मागील आठवडा भरापासून सुरू असलेल्या पावसामुळे ठिक-ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. याचा बीडकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे.
रस्त्यावरील साचलेल्या पाण्याचे जलपूजन करून शिवसंग्रामचे आंदोलन - शिवसंग्रामचे आंदोलन
बीड शहरात रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे हे खड्डे पाण्याने भरले असून नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. खड्ड्यात साठलेल्या पाण्याचे पूजन करुन शिवसंग्राम पक्षाने एक अनोखे आंदोलन केले आहे.
नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने या विरोधात गुरुवारी शिवसंग्राम संघटनेच्याच पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यातील साचलेल्या पाण्याचे जलपूजन करून नगरपालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे.
बीड शहरात मागील आठवडा भरात झालेल्या पावसाने सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. यातच शहरातील अंतर्गत रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले आहेत. नगरपालिके कडून कसलेच नियोजन नसल्याचा आरोप शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. खड्डे व त्यामध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. याचाच निषेध म्हणून शिवसंग्रामने गुरुवारी बीड शहरातील रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्याचे जलपूजन करून अनोखे आंदोलन केले. यावेळी शिवसंग्राम संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.