बीड- दोन वर्षांपासून कोरडा दुष्काळ आणि आता ओला दुष्काळ पडला आहे. यामुळे शेतकऱ्याजवळ काहीच राहिले नाही. शासनाने सरसकट शेतकऱ्यांचे कर्जमाफ करून तत्काळ पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर द्यावेत, अशी मागणी करत सोमवारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ओरिएंटल पीक विमा कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी बीड जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे गंगाभीषण थावरे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
बीडमध्ये शेतकरी संघटना आक्रमक हेही वाचा -मला विश्वास, नवीन सरकार लवकरच स्थापन होईल - देवेंद्र फडणवीस
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परतीच्या पावसाने बळीराजाला आर्थिक दृष्टया उद्ध्वस्त केले आहे. मागच्या दोन वर्षापासून कोरडा दुष्काळ आणि आता ओला दुष्काळ पडला आहे. या सगळ्या परिस्थितीत शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांकडील कर्ज सरसकट माफ करावे व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तत्काळ पीक विम्याचे पैसे टाकावेत, अन्यथा बीड जिल्ह्यातील शेतकरी स्वस्त बसणार नाही. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे बळीराजा खचला जात असल्याचा आरोप देखील यावेळी शेतकरी संघटनेचे नेते गंगाभीषण थावरे यांनी केला आहे. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी सरकार व प्रशासनाच्या नावाने बोंबा ठोकल्या.
हेही वाचा -शरद पवारांसह मुख्यमंत्रीही आज दिल्लीत, सरकार स्थापनेचा घोळ मिटणार का?
बीड शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला होता. जालना रोड मार्गे थेट ओरिएंटल वीमा कंपनीच्या कार्यालयावर हा मोर्चा धडकला. यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मोर्चे काढणाऱ्यांचे निवेदन स्वीकारले असून शेतकऱ्यांना तत्काळ पीक विम्याचे पैसे दिले जातील, याबाबत आश्वासन दिले आहे. यावेळी जिल्हाभरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.