'माणूसकीचा झरा': वेदनेशी नातं सांगत शांतीवन देतेय 800 ऊसतोड मजुरांना मोफत जेवण! - lockdown in beed
लॉकडाऊन दरम्यान राज्यभरात विविध ठिकाणी कामगार आणि मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात अडकला आहे. हातावर पोट असल्याने त्यांचे काम बंद झाले. यामुळे एक वेळच्या जेवणासाठी देखील त्यांना कष्ट घ्यावे लागत आहेत. मात्र, अशा परिस्थितीत अनेकांनी मदतीचा हात पुढे केलाय. ठिकठिकाणी व्यक्ती तसेच संस्था गरजूंच्या मदतील धावल्या आहेत. 'ईटीव्ही भारत' अशा उपक्रमांचा 'ग्राऊंड रिपोर्ट' समोर आणत आहे. या लेखात जाणून घ्या बीडमधील ऊसतोड कामगारांना मदत पोहोचवणाऱ्या संस्थेबद्दल..
'माणूसकीचा झरा': वेदनेशी नातं सांगत शांतीवन देतेय 800 ऊसतोड मजुरांना मोफत जेवण!
बीड -सामाजिक भान ठेवत कोरोनाच्या लढ्यामध्ये ऊसतोड मजुरांसाठी शांतीवन संस्था सरसावली आहे. यासोबतच त्यांनी अनाथांना देखील मदतीचा हात पुढे केलाय. 11 एप्रिल पासून लॉकडाऊनमुळे अडकलेले ऊसतोड मजूर तसेच संस्थेत वास्तव्य करत असलेल्या अनाथ मुलांसाठी दोन वेळेचं जेवण शांतीवन पुरवत आहे. या संस्थेचे प्रमुख दीपक नागरगोजे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दररोज 800 लोकांचा स्वयंपाक करण्यात येत असल्याचे सांगितले.
2 तासात 800 जणांचा स्वयंपाक
शांतीवन संस्थेत 'कम्युनिटी किचन' ही संकल्पना दीपक नागरगोजे यांनी राबवली आहे. यापूर्वी अनेकदा आपत्ती व्यवस्थापनाचा अनुभव असल्यामुळे नागरगोजे यांनी 'कम्युनिटी किचन' मध्ये एकाच ठिकाणी आठशे लोकांचा स्वयंपाक करण्यात येत असल्याचे सांगितले.यामध्ये हा स्वयंपाक बनवण्यासाठी केवळ दोन तास लागतात. ऑटोमॅटिक पोळ्या बनवणारी मशीन बसवण्यात आली आहे. त्यामुळे स्वयंपाक बनवण्यासाठी मनुष्यबळही कमी लागते. सर्वात महत्वाचे म्हणजे शांतीवन संस्थेच्या मालकीची जमीन आहे. यामध्ये भाजीपाला पिकवला जातो. त्यामुळे भाजीपाला विकत आणण्याची गरज नसल्याचे संस्था प्रमुखांनी सांगितले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.