बीड : परळी तालुक्यातील सिरसाळा पासून जवळच असलेल्या आमला (ता.धारूर) येथील शंकर जिजाभाऊ सोळंके याने कोरोना काळात धाडस करून टरबुजाची लागवड केली. हा युवा शेतकरी गेले पाच वर्षे एका खासगी कंपनीत पुण्याला कामाला होता. परंतु कोरोना काळात तो पुण्यातील काम सोडून मूळ गावी आला. आता काय करावे या विवंचनेत असताना डॉ. बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी प्रवीण सोळंके सर यांच्या सल्यानुसार हलक्या व मुरमाड शेतीमध्ये बदल करीत टरबूज या पिकावर आपले लक्ष केंद्रित केले. आता भरघोस उत्पन्न घेत चांगली आर्थिक प्रगती साधली आहे. पारंपरिक पिके घेऊन आर्थिक उत्पन्न टिकवून ठेवणे हे शेतकरी वर्गाचे गणित असते. मात्र आजच्या तरुणाईला हे गणित न पटणारे आहे. शेतीमध्ये काहीतरी नवीन प्रयोग करून दाखवण्याची जिद्द त्यांच्यात दिसून येत आहे. तरुण शेतकरी शंकर सोळंकेने ते करून दाखवले आहे.
कमी पाण्यावर मिरची या पिकात धाडस करून ३ पॅकेट (३००० बियांची) टरबूज लागवड केली. यातून १६ टन टरबूज पिकाचे उत्पन्न घेतले आहे. किलोला ८.५० रुपये असा भाव मिळाला. एकूण १,३६,००० रुपये मिळाले. खर्च ३४,००० रुपये जाता ७० दिवसात १०२००० रुपये निव्वळ नफा मिळाला आहे. विशेष म्हणजे हे सारे उत्पन्न केवळ एका एकरात घेतले आहे. तरी परिसरातील शेतकरी वर्गासमोर त्याने नवा आदर्श निर्माण केला आहे. या भागात प्रामुख्याने कांदा, गहू, मिरची, ऊस, मका ही पारंपरिक पिके घेण्यावरच शेतकरी वर्गाचा कल असतो. पण सोळंकेने टरबुजाची लागवड करीत भरघोस उत्पन्न घेतले.