महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shivaji Maharaj Jayanti 2023 In Beed: सर्वधर्म समभाव रॅलीने बीड शहरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा; शिवकालीन खेळांनी वेधले लक्ष - छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2023

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज बीड शहरात सर्वधर्मीय मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेतील देखावे, विविध धर्मगुरू यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे पूजन करून या रॅलीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत मुस्लिम बांधवांचा प्रामुख्याने सहभाग होता. बीड शहरातील उर्दू, मराठी, इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील हजारो विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये सहभागी घेतला होता.

Shivaji Maharaj Jayanti 2023 In Beed
बीड शिवजयंती कार्यक्रम

By

Published : Feb 19, 2023, 6:27 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमात सहभागी नागरिक

बीड: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावरुन मिरवणुकीस सुरुवात झाली. या मिरवणुकीत विविध शाळांचे विद्यार्थी लेझीमसह विविध कलाप्रकार सादर करण्याबरोबरच ऐतिहासिक देखावेही लक्ष वेधून घेत होते. या मिरवणुकीमध्ये हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी सहभागी झाले होते. बीड शहरातून शिस्तबद्ध निघालेल्या या मिरवणुकीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वधर्म समभावा संदर्भातील विचार समाजापुढे मांडण्यात आला.


काठीचा खेळ ठरला आकर्षणाचे केंद्र : या कार्यक्रमात मुख्य आकर्षण ठरला तो काठी फिरवण्याचा खेळ. पूर्वीच्या काळी जंगलात, दऱ्याखोऱ्यात राहणारी माणसे हा खेळ शिकायचे. आजच्या या सर्वधर्मीय शिवजयंती महोत्सवामध्ये काठी चालवण्याचा एक अनोखा प्रयोग दोन तरुणांनी बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर करून दाखवला. हे या जयंतीचे मुख्य आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. यावेळी बीडच्या समता दलानेही छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त आगळी-वेगळी सलामी दिली. तर एका समता दलाच्या कार्यकर्त्याने हातात काठी घेऊन काठीचा खेळ दाखवण्याचा अनोखा प्रयोग सादर केला.

सर्व धर्मातील लोकांचे महाराजांना अभिवादन:आम्ही सर्वधर्मीय आणि सर्व संघटना मिळून 'तुम्ही आम्ही बिडकर' या बॅनरखाली छत्रपती शिवजन्मोत्सव साजरा करतो. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळात त्याला खंड पडला होता. मात्र यावर्षी मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळत आहे. विशेष करून मी एमआयएम पक्षाचा जिल्हा अध्यक्ष असून माझ्यासह सर्व मुस्लीम बांधव त्याचबरोबर सर्व उर्दू शाळेतील विद्यार्थी सुद्धा वेशभूषामध्ये या शिवजन्म उत्सवामध्ये मोठ्या उत्साहाने सामील झालेले आहेत. बीड शहरातील सर्व संघटना सर्व धर्मातील लोक या शिवजन्मोत्सवात मोठ्या उत्साहाने सामील झालेले आहेत. त्यामुळे हा शिवजन्मोत्सव साजरा करत असताना आम्ही सर्वांना एक आव्हान केले आहे की, आपण सर्व 'तुम्ही आम्ही बिडकर' म्हणून एका बॅनरखाली शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहोत. या शिवजन्मोत्सवाचे एक साक्षीदार व्हा, असे आवाहन आम्ही बीडवासियांना केले आहे, असे मत एमआयएम जिल्हाध्यक्ष शेख शफीक यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी:बीडच्या माजलगाव शहरात महाराष्ट्रातील सर्वांत मोठी छत्रपती शिवाजी महाराज यांची 25 हजार स्क्वेअर फुटांवर रांगोळीतून भव्य प्रतिमा साकारण्यात आली. शहरातील सुंदरराव सोळंके महाविद्यालयाच्या प्रांगणात शिवजन्मोत्सव समितीचे प्रमुख बाळू ताकट यांच्या संकल्पनेतून, ही रांगोळी साकारली गेली. तब्बल 60 क्विंटल रांगोळीच्या माध्यमातून हे छायाचित्र तयार करण्यात आले आहे. हे छायाचित्र तयार करण्यासाठी आठ दिवस लागले असून आठ कारागिरांनी हे काम केले आहे. तर हा सुंदर फोटो पाहण्यासाठी माजलगाव आणि परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. परभणी येथील छत्रपती आर्ट् ग्रुप मधील कैलास राखोंडे, मारुती भैरट, वैष्णवी पांचाळ, अंबिका गायकवाड, मिथुन आडे, केशव वरणे, अनुष्का चांदेल, गणेश शेजूळ या 8 कलाकारांनी ही प्रतिमा रांगोळीद्वारे साकारली. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला सायंकाळी 5 वाजता शिवप्रेमींसाठी ती खुली करण्यात आली होती.


काय म्हणतात कारागीर:शिवजन्मोत्सव नेहमी वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आमचा मानस असतो. त्यातूनच रांगोळीमध्ये शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा साकारण्याची संकल्पना सुचली. त्याला परभणी येथील कलाकारांनी आठ दिवसाची मेहनत घेऊन योग्य आकार दिला. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वांत मोठी प्रतिमा साकारता आली, असे संयोजक बाळू ताकट यांनी सांगितले.


काय म्हणतात छायाचित्रकार:दहा वर्षांपासून शिवजयंती उत्सव समितीच्या निमित्त माजलगाव तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या शिवजयंतीनिमित्त मुख्य आकर्षण म्हणून सर्वधर्मीय विवाह सोहळा होणार आहे. या ठिकाणी माजलगावकरांना वेगळे काहीतरी दाखवण्यासाठी, जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवरायांचे छायाचित्र रेखाटले गेले नव्हते. या रांगोळीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यात सर्वांत मोठी म्हणजे 25 हजार स्क्वेअर फुटामध्ये ही रांगोळी 8 दिवसांपासून चित्र रेखाटण्याचे काम चालू होते. आज ते पूर्ण झाले. हे छायाचित्र रेखाटत असताना जवळपास 50 ते 60 क्विंटल रांगोळी या ठिकाणी लागलेली आहे. लातूर या ठिकाणीसुद्धा रांगोळी काढण्यात आली होती. मात्र त्याच्यापेक्षा सर्वांत मोठी रांगोळी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे.

हेही वाचा:Shiv Jayanti : छत्रपती संभाजीराजे संतापले! मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री पाहतच राहिले

ABOUT THE AUTHOR

...view details