बीड- मागील पाच वर्षापासून मराठवाड्यात दुष्काळी स्थिती आहे. अशा परिस्थितीत बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. या सगळ्या बाबींचा विचार करून राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जूनमध्ये पेरणीसाठी एकरी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, याशिवाय शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क देखील माफ करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा अध्यक्ष राहुल वाईकर यांनी मंगळवारी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
येत्या आठवड्याभरात राज्य सरकारने हा शेतकऱ्यांबाबतचा निर्णय घ्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन संभाजी ब्रिगेड मराठवाड्यात करेल असा इशाराही राहुल वाईकर यांनी यावेळी दिला आहे.
बीड जिल्ह्यात सहा लाखांवर शेतकऱ्यांची संख्या आहे. मागील सहा वर्षांपासून सातत्याने पडणाऱ्या दुष्काळाचा परिणामाने बळीराजा हतबल झाला आहे. अनेक शेतकऱ्यांना मागील तीन-चार वर्षात शेतातून काहीच उत्पन्न मिळाले नाही. ही सगळी वस्तुस्थिती पाहता राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी एकरी दहा हजार रुपये आर्थिक मदत करावी अशी मागणी बीड येथील संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल वाईकर यांनी बीड जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.