बीड - जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे. गेल्या आठवड्यात शिवाजीनगर पोलिसांनी तीन आरोपींना रेमडेसिवीर विकताना रंगेहात पकडले होते. या प्रकरणाच्या तपासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये सलाईनचे पाणी टाकून विकण्याचा प्रयत्न झाला आहे. ही माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
रेमडेसिवीरच्या बाटल्यांमध्ये सलाईनचे पाणी टाकून विक्री झाल्याचे पोलिसांनी शोधून काढले काय आहे प्रकरण -
राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी या इंजेक्शनचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बीडमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनच्या नावाखाली एका व्यक्तीला बनावट इंजेक्शन देण्यात आले. याच दरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी दोघा जणांना रंगेहात पकडले. या प्रकरणात अधिक तपासाअंती धक्कादायक बाब समोर आली. आरोपींनी रुग्णालयातील रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये सलाईनचे पाणी टाकून ते 22 हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी दिली. नागरिकांनी विकत घेतलेले इंजेक्शन हे ओरिजनल आहे की नाही हे नक्की तपासून पहा, असे आवाहन देखील त्यांनी केले.
काळ्याबाजारात देखील काळाबाजार!
काळ्याबाजारात एका इंजेक्शनची किंमत जवळपास 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत आहे. हे इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठे प्रयत्न करावे लागतात. रेमडेसिवीरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जाते. परंतु, नोंदणी केल्यानंतर जवळपास सहा दिवसानंतर देखील इंजेक्शन मिळत नाही. त्यामुळेच काळाबाजारातून इंजेक्शन विकत घेण्याची वेळ नातेवाईकांवर येते. परंतु, या प्रकारानंतर काळ्या बाजारातील इंजेक्शन देखील ओरिजनल मिळण्याची शाश्वती राहिली नसल्याचे उघड झाले.