बीड- लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. त्यातच नाराजी नाट्याचा अंकही सगळ्याच पक्षात रंगताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची कुंचबना आणि त्यावर प्रतिक्रिया म्हणून पाडापाडीच्या राजकारणाचे डावपेचही सर्वत्र पाहायला मिळत आहेत. तसेच चित्र जिल्ह्यातही पाहायला मिळत आहे. ज्या कार्यकर्त्यांच्या बळावर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी गल्ली ते दिल्ली राजकीय प्रवास केला तेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे जुने व 'थिंक टँक' असलेले कार्यकर्ते भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रचारापासून दूर असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात आहे. नाव न छापण्याच्या अटीवर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी आपली खंत आणि भावना व्यक्त केली आहे. कार्यकर्ते म्हणातात की, केवळ आमची हिंदुत्ववादाची भूमिका आहे, म्हणून आम्ही भाजपबरोबर आहोत. अन्यथा आम्हाला बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर सन्मानाची वागणूक मिळाली नाही. भाजपमध्ये मागील काही महिन्यांमध्ये 'आयारामां' ची संख्या वाढली असल्याने गोपीनाथ मुंडे यांचे 'थिंक टँक' प्रचारापासून दूर आहेत.
बीड लोकसभा मतदारसंघात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर त्यांच्या वारस त्यांची मुलगी डॉक्टर प्रीतम मुंडे भाजपच्या तिकिटावर बीडमधून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. ज्या गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या जनतेवर सातत्याने स्वतःचा प्रभाव कायम ठेवला. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे पक्षाच्या बाहेर जाऊन मित्रत्वाचे संबंध असल्याने गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी विरोधक देखील आतून मदत करत होते. हे त्यांच्या निवडणुकांचे वैशिष्ट्य असायचे. बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक असायचे. गोपीनाथ मुंडे यांना कुठल्या सभेत कुठल्या तालुक्यात काय बोलायचे याबाबत मार्गदर्शन करत असत. ती टीम 2019 च्या निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे यांच्यासाठी काम करत नसल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. याचा मोठा फटका डॉ. प्रीतम मुंडे यांना बसू शकतो. जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांचे 'पॅचअप' करण्याचे मोठे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर आहे.