महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अपहरण नव्हे, परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने 'त्याने' सोडले घर

चार दिवसापासून घरातून निघून गेलेल्या अजय उर्फ बबलू कृष्णा मुंडे या दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा शोध सुरू होता. सोमवारी एमआयडीसी चिखलठाणा ( औरंगाबाद) पोलीसांनी व्हॉट्सअॅपच्या आधारे त्याला सुखरूप आई-वडिलांकडे सोपवले.

परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने 'त्याने' सोडले घर
परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने 'त्याने' सोडले घर

By

Published : Feb 24, 2020, 11:31 PM IST

बीड- दहावीच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने ऐन परीक्षेच्या काळातच घरातून निघून गेलेल्या पंधरा वर्षीय मुलाचा तपास पोलिसांनी लावला. मुलाला औरंगाबाद येथून ताब्यात घेऊन आई वडिलांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांनी तीन दिवसातच या अपहरण प्रकरणाच्या नाट्याचा पर्दाफाश केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, की चार दिवसापासून घरातून निघून गेलेल्या अजय उर्फ बबलू कृष्णा मुंडे या दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा शोध सुरू होता. सोमवारी एमआयडीसी चिखलठाणा ( औरंगाबाद) पोलिसांनी व्हॉट्सअॅपच्या आधारे त्याला सुखरूप आई-वडिलांकडे सोपवले.

अजय याचे अपहरण झाल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार प्रकाश सोळंके यांनी राज्यातील सर्व पोलीस ठाण्यात माहिती कळवून तपासाची चक्रे गतिमान केली. वास्तविक पाहता दहावीची परीक्षा आपण पास होऊ की नाही ? अशी भीती वाटत असल्याने तो स्वतःहून घरातून निघून गेला होता. त्याचे अपहरण झाले नव्हते, असे तपासी पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश सोळंके यांनी सांगितले.

गुरुवार दिनांक २० दुपारी १२ वाजताच्या सुमारास अभ्यास करण्यासाठी म्हणून अजय एका खाजगी अभ्यासिकेत गेला होता. सायंकाळ झाली तरी तो घरी न परतल्याने आई-वडिलांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. परंतु, तो सापडला नाही. अखेर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात जाऊन अजयचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदविली होती. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अंबाजोगाईहून अजय २० तारखेला दुपारी एसटीने परळी येथे पोहोचला. तिथून रेल्वेने परभणी मार्गे औरंगाबादला गेला. त्याठिकाणी कामाच्या शोधात असताना एका कुलकर्णी नावाच्या व्यक्तीसोबत त्याची भेट झाली. दोघे कामाचा शोध घेत असताना ट्युशन एरियामध्ये अजयला एका शिक्षकाने पाहिले. त्यांनी ही बाब कुलकर्णी यांना सांगितली. कुलकर्णी अजयला थेट एमआयडीसी पोलीस स्टेशन चिकलठाणा येथे घेऊन गेले. त्यानंतर चिखलठाणा पोलिसांनी अंबाजोगाई पोलिसांना माहिती दिली आणि खातरजमा ओळख पटल्यानंतर अजयला नातेवाईकांकडे सुखरूप पोचविण्यात आले.

अंबाजोगाई येथे आल्यानंतर पोलीसांनी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून अजयला आई-वडिलांच्या स्वाधीन केले. परीक्षेत पास होईल की नाही अशी भिती वाटल्याने मी गेलो होतो, अशी माहिती अजयने पोलीसांना दिली. मुलगा परत आल्याने आई-वडीलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details