बीड - लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला म्हणून काँग्रेसच्या नेत्याला मंत्री पंकजा मुंडे यांच्या सांगण्यावरून मारहाण झाली. पंकजा मुंडे यांच्या झुंडशाहीमुळे बीडमध्ये कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. बीडच्या लोकसभा निवडणुकीवर मंत्री पंकजा मुंडे यांच्यामुळे दहशतीचे सावट असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रवींद्र दळवी यांनी केला आहे. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
पंकजा मुंडेंच्या झुंडशाहीमुळे बीडमधील कायदा व सुव्यवस्था धोक्यात - रवींद्र दळवी
बीडच्या लोकसभा निवडणुकीवर मंत्री पंकजा मुंडे यांच्यामुळे दहशतीचे सावट असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रवींद्र दळवी यांनी केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयातच अर्ज छाननी दरम्यान भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या अर्जामधील माहितीवर काँग्रेसचे परभणी जिल्ह्याचे प्रभारी दादासाहेब मुंडे यांनी आक्षेप घेतला. यामुळे दादासाहेब मुंडे यांच्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेसचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य रवींद्र दळवी यांनी गुरुवारी बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपवर झुंडशाहीचा आरोप केला. बीडची पोलीस भाजपची हस्तक असल्यासारखे वागत आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्या झुंडशाहीमुळे बीडची लोकसभा निवडणूक दहशतीखाली आहे. जर अशाप्रकारे घटना घडत राहिल्या व पोलिसांनी दुर्लक्ष केले तर लोकसभा निवडणुका लढवायच्या कशा असा प्रश्न काँग्रेसचे रवींद्र दळवी यांनी उपस्थित केला.
बीडमध्ये काँग्रेस नेत्यावर हल्ला केलेल्या भाजपच्या गुंडांना २४ तासात जर बीड पोलिसांनी पकडले नाही तर राज्यभरात काँग्रेस आंदोलन करेल, असा इशाराही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे, प्रशांत पवार, इद्रीश हशमी, नागेश मिटे, गोविंद साठे आदींची उपस्थिती होती.