बीड - केंद्रीय कीटक नाशक मंडळाची परवानगी न घेता कृषी औषधे बनवणाऱ्या एका कारखान्यावर गुरुवारी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईमध्ये 19 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर शिवाजी राख (रा. होळ ता. केज), नंदलाल बाळासाहेब शिंदे, शिवाजी मच्छिंद्र मुळे या तिघांच्या विरोधात बोगस कीटकनाशक बनवल्या प्रकरणी शहरातील पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा -हातातोंडाशी आलेल्या कोथिंबीरीच्या शेतावर फिरवला ट्रॅक्टर...
शहरातील एमआयडीसी भागात विनापरवाना कीटकनाशक बनवण्याचा कारखाना चालवला जात असल्याची माहिती बीड जिल्हाधिकारी कुमार पांडे यांना मिळाली होती. बीडचे कृषी अधीक्षक राजेंद्र निकम व तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांना ही माहिती सांगितल्यानंतर एमआयडीसी भागात बोगस कृषी औषधे बनवणाऱ्या कारखान्याचा शोध सुरू झाला. या शोधकार्यात अखेर एमआयडीसी भागात एका रॉकेलच्या गोदामात कीटकनाशके बनवली जात असल्याचे सापडले. यामध्ये निंबोळी अर्क बनवून कृषी सेवा केंद्रांना वितरित केला जात होता. तर फिर्यादी जिल्हा गुणनियंत्रक संतोष गाडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे.