बीड - बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? याची मोठी चर्चा गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यात होती. अखेर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसने बीड लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर केली. भाजपकडून प्रीतम मुंडे यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रीतम मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे अशी लढत होऊ शकते. गेल्या २ दिवसांपासून माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे नाव चर्चेत होते. मात्र ऐनवेळी पक्षाने बजरंग सोनवणे यांचे नाव जाहीर करून करून धक्कातंत्र वापरले आहे.
बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे रिंगणात - lok sabha
राष्ट्रवादी काँग्रेसकडून बीड लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होताच राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. आता हळूहळू प्रचारही शिगेला पोहोचेल अशी परिस्थिती बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
कोण आहेत बजरंग सोनवणे ?
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे व शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून २०१२ पासून बजरंग सोनवणे राष्ट्रवादीचे काम करत आहेत. केज तालुक्यातील सारणी (आनंदगाव) हे त्यांचे मूळ गाव असून येडेश्वरी साखर कारखानाच्या माध्यमातून त्यांनी मतदार संघाची नाळ पकडून ठेवले आहे. ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच या पदापासून राजकारणाची त्यांची सुरुवात आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून ३ वेळा ते जिल्हा परिषद सभागृहात आलेले आहेत. तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन, या शिवाय राजषी शाहू महाराज तालुका पतसंस्थेचे चेअरमन अशा विविध पदावर काम केले आहे. त्यांच्या पत्नी देखील जिल्हा परिषद सदस्य आहेत.