बीड- मत विभागणीसाठी मुस्लीम समाजाचा वापर होऊ शकतो. वंचित आणि इतर माध्यमातून मुस्लीम उमेदवार उभा करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एम.आय.एम हा पक्ष वरुन जरी हिरवा दिसत असला तरी आतून त्याचा रंग शिवसेना-भाजपचा आहे. त्यामुळे मत विभागणीसाठी मुस्लीम समाजाचा वापर करणार्यांना धडा शिकविण्याचे आवाहन, प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केले आहे
बीड जिल्ह्यातील गेवराई येथे राष्ट्रवादी मुस्लीम मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, फारुख पटेल यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. विजयसिंह पंडित यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमेच्या तरुणाला विधानसभेत पाठविण्याची गरज आहे. मुस्लीम समाजाच्या आरक्षणासह इतर सामाजिक प्रश्नांवर त्यांनी सतत आवाज उठविला, त्यामुळे गेवराईतील मतदारांनी विजयसिंह पंडित यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन मेहबूब शेख यांनी केले.
गेवराईतील मतदार हुशार आहे. देशभरात कुठे काय चालले त्याचा अंदाज त्यांना येतो. विजयसिंह पंडित यांना आमदार करण्यासाठी मी वारंवार गेवराईकरांच्या संपर्कात राहील. कोणाच्याही भूलथापांना आणि खोट्या प्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन माजी आमदार सय्यद सलीम यांनी यावेळी केले. अल्पसंख्याक समाजातील मुलांना बोलीभाषेत शिक्षण मिळाले पाहिजे, उर्दू माध्यमांच्या शाळांना शिक्षक मिळाले पाहिजेत, यासाठी विधानपरिषदेत आवाज उठविला. भाजपा सरकारला मुस्लीम समाजाविषयी व्देष असल्यामुळे त्यांनी आरक्षण दिले नाही, असे प्रतिपादन यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले. पक्षसोडून जाणार्यांची काळजी करु नका. राष्ट्रवादी हा एकमेव आपला पक्ष आहे. शरद पवारांना बळ देण्यासाठी त्यांच्या पाठिशी आपली ताकद उभा करण्याचे आवाहन, बीड नगर परिषदेचे गटनेते फारुख पटेल यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, बीड चे माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार अमरसिंह पंडित, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, नगर परिषद गटनेते फारुख पटेल, नगरसेवक खदीरभाई जवारीवाले, अशफाक इनामदार, जयतुल्ला खान, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष बरकत पठाण, बाबा खान, परवेज देशमुख, शेख शफिक, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, ऋषिकेश बेदरे यांच्यासह मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. मेळाव्याला मुस्लीम समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. विजयसिंह पंडित यांना विधानसभेत पाठविण्याचा निर्धार यावेळी समाज बांधवांनी केला.