महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 25, 2021, 6:51 PM IST

ETV Bharat / state

चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या अंबाजोगाईच्या महिलेस पुणे पोलिसांनी केली अटक

गर्भपात झाल्याचे पती व घरच्यांपासून लपवून चार महिन्यांच्या चिमुकलीला घरातून पळवून नेणाऱ्या महिलेला पोलिसांनी अंबाजोगाईतून अटक केली आहे.

beed
चिमुकलीचे अपहरण

अंबाजोगाई - गर्भपात झाल्याचे पती व घरच्यांपासून लपवून चार महिन्यांच्या चिमुकलीला घरातून पळवून नेणाऱ्या महिलेला पोलिसांनी अंबाजोगाईतून अटक केली आहे. आरोपी महिलेच्या ताब्यातून बाळाची सुखरूप सूटका करण्यात आली आहे. बाळ पळवून नेल्याची घटना 17 फेब्रुवारी रोजी चाकण येथे घडली होती. राणी शिवाजी यादव (वय 28 रा. कुत्तरविहिर अंबाजोगाई )असे आरोपी महिलेचे नाव आहे. धनश्री राजेंद्र नागापूरे (वय 4 महिने )असे चिमुकलीचे नाव आहे.

याबाबत राजेंद्र प्रभाकर नागापूरे (वय 53 रा.चाकण) यांनी तक्रार दिली होती. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार नागापूरे राहत असलेल्या ठिकाणी आरोपी महिला 17 फेब्रुवारी रोजी काम मिळवण्याच्या बहाण्याने आली. त्यानंतर नागापूरे यांची मुलगी धनश्री हिला घरातून घेवून निघून गेली. याबाबत गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी 100 सीसीटीव्ही कँमेऱ्याच्या फुटेजची पाहणी केली. बाळाचे अपहरण करणारी महिला बालाजीनगर, मेदनकरवाडी येथे गुन्हा घडण्यापूर्वी काही दिवस राहण्यास होती. मात्र, गुन्हा घडल्यानंतर ती बेपत्ता आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली. संशय बळावल्याने आरोपी महिलेचे रेखाचित्र तयार करून तिचा पोलिसांनी शोध सुरू केला. आरोपी महिलेला पोलिसांनी अंबाजोगाई येथून चार महिन्यांच्या बाळासह ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केली असता तिने बाळाचे अपहरण केल्याचे सांगितले.

बाळाचे जन्मदाते वेगळेच :

तक्रारदार नागापूरे व त्यांची पत्नी हे अपह्त बाळाचे जन्मदाते नाहीत. ही बाब तपासात समोर आली. पुण्यात शिक्षण घेत असलेल्या एका जोडप्याला प्रेमसंबंधातून हे बाळ झाले होते. त्या जोडप्याने नागापूरे दांपत्याच्या नावाचा वापर करुन चाकण येथील एका दवाखान्यात बाळाला जन्म दिला. त्यानंतर नागापूरे यांना ते बाळ देवून टाकले. बाळाचा सांभाळ करत असले तरी नागापूरे हे त्याचे जन्मदाते नसून ,अन्य जोडपे असल्याचे समोर आले.

बाळाला सांभाळण्याचा बहाणा केला :

आरोपी राणी हिचा गर्भपात झाला. मात्र याबाबत घरच्यांना सांगितले नाही. त्यामुळे तिला एक नवजात बाळ पाहिजे होते. दरम्यान, नागापूरे हे बाळाचा सांभाळ करण्यासाठी एका महिलेच्या शोधत होते. याबाबत आरोपी राणी हिला माहिती मिळाली. बाळाला सांभाळण्याच्या बहाण्याने नागापूरे यांच्याकडे आल्यानंतर चार महिन्याच्या धनश्री हिला घेवून पळून गेली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details