बीड - ३ वर्षे हप्ते भरल्यानंतर पाचव्या वर्षी दामदुप्पट पैसे किंवा त्या रकमेचा प्लॉट, फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून पुण्याच्या मेरीट लॅन्ड मार्क्स कंपनीने बीडकर ठेवीदारांना तब्बल ९० लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. यामुळे या कंपनीत गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी कंपनीच्या अध्यक्ष व संचालकांवर शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुण्याच्या मेरिट लॅन्ड मार्क्स कंपनीकडून फसवणूक -
मागील काही वर्षांत बीडकरांना विविध कंपन्या, साखळी पद्धतीने गुंतवणूक करणारे ग्रुप आणि ज्यादा व्याजदराचे आमिष दाखवून काही मल्टिस्टेट बँकांनी कोट्यवधी रुपयांना लुबाडले आहे. त्यात आता पुण्याच्या मेरिट लॅन्ड मार्क्स या कंपनीचीही भर पडली आहे. या कंपनीने बीडमध्ये जालना रोडवर लक्ष्मी संकुलात आपले कार्यालय थाटले होते. १ हजार रुपयांपासून गुंतवणूक करुन ३ वर्षे हप्ते भरा आणि पाचव्या वर्षी दामदुप्पट रक्कम मिळवा किंवा त्याच किमतीचा प्लॉट किंवा फ्लॅट मिळवण्याची योजना या कंपनीने आणली होती. घर, जमीन होईल या आशेने अनेकांनी सन २०१४ ते २०१७ या काळात या कंपनीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. मात्र, पाच वर्षे होईपर्यंतच कंपनीने कार्यालय बंद करुन बस्तान बांधले. गुंतवणूकदारांना अंधारात ठेवत कंपनीने गाशा गुंडाळला.