बीड - परळी ते अंबाजोगाई हा १८ किलोमीटरचा रस्ता संबंधित ठेकेदाराने खोदून ठेवला आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. यानंतर या रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करावे, या मागणीसाठी नागरिकांनी रविवारी सकाळपासून रस्तारोको सुरू केला आहे. दीड ते दोन तासापासून हा रस्ता बंद असल्यामुळे लांब पल्ल्याच्या बसगाड्या अडकून पडल्या आहेत. अचानक झालेल्या रस्तारोकोमुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली.
परळी अंबाजोगाई रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांनी सुरू केला रस्ता रोको - bus
अनेक वर्षांपासून परळी-अंबाजोगाई रस्त्याचे काम पूर्ण होत नाही. ठेकेदाराने हा रस्ता खोदून ठेवला आहे.
अनेक वर्षांपासून परळी-अंबाजोगाई रस्त्याचे काम पूर्ण होत नाही. ठेकेदाराने हा रस्ता खोदून ठेवला आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण झाली आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. हा रस्ता पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या मतदारसंघातीलच आहे. असे असतानाही रस्त्याचे काम रखडल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. याशिवाय प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळीला दूरवरून भाविक येतात, मात्र खराब रस्त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
यापूर्वी नागरिकांनी बॅनरच्या माध्यमातून परळी-अंबाजोगाई मार्गावर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा मोठा फोटो लावून हा रस्ता कधी करणार? असा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, याकडे एकाही लोकप्रतिनिधीचे लक्ष गेले नाही. त्यामुळे अखेर स्थानिक नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता.