बीड - २०१९ मध्ये रेल्वेत बसून बीड लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मी बीडला येईल, असे मी कधीच म्हणाले नव्हते, विरोधक जाणीवपूर्वक रेल्वेच्या संदर्भाने माझ्यावर टीका करत आहेत. जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात सोलापूरवाडीपर्यंत नगर, बीड, परळी, रेल्वे आणली आहे, असे बीड लोकसभा मतदार संघाच्या भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी सांगितले. सोमवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. प्रीतम मुंडे यांच्यावर रेल्वेच्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडले होते. विरोधकांच्या टीकेला प्रीतम मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित जाहीर सभेतून उत्तर दिले आहे.
बीड लोकसभा मतदार निवडणुकीच्या रणधुमाळीचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरू झाला आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दिवसेंदिवस प्रचाराला वेग येत आहे. आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. सोमवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, २०१९ च्या निवडणुकीत रेल्वेत बसूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बीडला येईल असा शब्द जनतेला दिलेल्या प्रीतम मुंडे यांनी रेल्वे का आणली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.