परळी (बीड) -कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी परळीचे प्रभू वैद्यनाथ मंदिर गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. बंदचा हा कालावधी आणखी वाढवण्यात आला असून, येत्या 4 एप्रिलपर्यंत याला मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आज नवे आदेश काढले आहेत. प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी संपूर्ण राज्यातील आणि देशातील भाविक दर्शनासाठी येतात आणि त्यामुळे गर्दी होण्याची श्यक्यता लक्षात घेता महाशिवरात्रीच्या अगोदर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. मंदिर बंदचा कालावधी आणखी वाढविण्यात आला आहे. पुढील 4 एप्रिलपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे. मंदिर जरी बंद असले तरी दैनंदिन पूजा विधी पुजाऱ्यांच्या मार्फत चालू असणार आहे.
गेल्या वर्षापासून मोठ्या प्रमाणात कोविड-१९ साथ रोगाचा प्रादुर्भाव चालू आहे. कोरोना रोगाच्या अनुषंगाने परळी वैजनाथ तालुक्यामध्ये, शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढत असल्याने व भाविक भक्त दर्शनाच्या निमित्ताने गर्दी करण्याची शक्यता असल्याने परळी वैजनाथ मंदिर बंद राहील. सदरील कालावधीत वैजनाथाचे प्रथेप्रमाणे पूजा व इतर बाबीं या पुजारी व विश्वस्त यांनी कोरोना विषयक नियम आहेत त्याचे पालन करुन करण्यास परवानगी असेल.
या आदेशांचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल असे सूचित केले आहे.
वैद्यनाथ मंदिर भाविकांसाठी उघडावे - ॲड.दत्ता महाराज आंधळे
सारे नियम सहिष्णू आहेत म्हणून मंदिरांनी किती दिवस सहन करायचे. देव आणि भक्त यांच्यात कायमचा दुरावा निर्माण करायचा आणि लोकांची भावना देवधर्मावरची उडवायची हाच हेतू यातून प्रकर्षाने मंदिर बंद ठेवून प्रत्ययाला येतो आहे काय? असा सवाल ॲड. दत्ता महाराज आंधळे यांनी प्रशासनाला विचारला आहे. भाविक भक्तांना त्यांच्या उपास्य देवतेच्या आराधनेपासून कडक निर्बंध लादून अगोदरच वंचित ठेवलेले आहे. शंभर फुटावरुन बेल, फुल, गंध, अक्षता याचेवर कडक नियमावली केली आहे .
भक्तांना दूर अंतरावरुन दर्शन घेण्याची सक्ती आहेच. परंतु देवधर्माची ओळख पण बुडली जावून नास्तिकवाद आपसूकच स्विकारला जाईल या उद्देशाने हे कुटील डाव टाकण्याचे पाप तर होत नाहीये ना. अशी शंका उपस्थित करून याचा निषेध कीर्तनकार तथा संतवाङमयाचे संशोधक आणि वारकरी साहित्य परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष ह.भ.प.ॲड.दत्ता महाराज आंधळे यांनी केला आहे. त्वरित वैद्यनाथ मंदिर उघडावे अशी मागणी त्यांनी केली असून मंदिर बंद असल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत प्रशासनाने भाविकांच्या भावनांचा आदर करत प्रभू वैद्यनाथ मंदिर उघडावे अशी मागणी दत्ता महाराज आंधळे यांनी केली आहे.