परळी वैजनाथ /घाटनांदूर (बीड) - 'एखादे बालक, व्यक्ती दिव्यांग असेल तर, अनेकदा त्याला हिणवले जाते. मात्र, अनेकदा केवळ जनजागृती व समज नसल्यामुळे लसीकरण न केल्याने त्याला दिव्यांग आयुष्य जगावे लागत असते. हे टाळण्यासाठी लसीकरण अतिशय आवश्यक आहे,' असे बीड जिल्हा परिषद अध्यक्ष शिवकन्या सिरसाट म्हणाल्या.
घाटनांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी (ता. ३१) सकाळी साडेआठ वाजता पल्स पोलिओ लसीकरण सुरू झाले. त्या प्रसंगी सिरसाट अध्यक्षपदावरून बोलत होत्या.
पुढे बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष शिवकन्या सिरसाट म्हणाल्या की, 'भविष्यातील संभाव्य आजार टाळण्यासाठी गरोदर माता, बालक यांचे लसीकरण अतिशय महत्त्वाचे असून आरोग्य विभागाप्रमाणेच नागरिक माता पालक यांनी सचेत राहिले पाहिजे. आजची बालके देशाचे भविष्य आहेत. ती सुदृढ राहिली तरच देशाचे भवितव्य उज्ज्वल राहील, असे सांगत कोविड लसीकरणावेळीही कुठलीही शंका न घेता न भिता लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.