पोलीस अधीक्षकांडून छळ होत असल्याची पोलीस निरीक्षकाची थेट महासंचालकांकडे तक्रार - बीड लेटेस्ट न्यूज
मला सतत अपमानास्पद वागणूक दिली जाते. एवढेच नाही तर अर्वाच्च भाषा वापरून मला सातत्याने त्रास देण्याचा प्रकार बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडून होत असल्याची तक्रार थेट महासंचालक यांच्याकडे पोलीस निरीक्षकाने केली असून स्वेच्छा निवृत्तीची मागणी केली आहे.
बीड -मला सतत अपमानास्पद वागणूक दिली जाते. एवढेच नाही तर अर्वाच्च भाषा वापरून मला सातत्याने त्रास देण्याचा प्रकार बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडून होत असल्याची तक्रार थेट महासंचालक यांच्याकडे पोलीस निरीक्षकाने केली असून स्वेच्छा निवृत्तीची मागणी केली आहे. एवढेच नाही तर माझे काही बरे वाईट झाल्यास एस.पी. जबाबदार असतील असे महासंचालकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
या प्रकरणी सविस्तर माहिती अशी आहे की, बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या विरोधात पोलीस निरीक्षक रविंद्र पेरगुलवार यांनी थेट पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली आहे. दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पोलीस अधीक्षक यांच्याकडून मला मिळणाऱ्या वागणुकीमुळे माझे स्वास्थ्य बिघडले आहे. मी प्रचंड तणावात आहे. याचाच परिणाम मी काम करू शकत नाही. सातत्याने होणाऱ्या अपमानामुळे मी पूर्णपणे खचून गेलो आहे. त्यामुळे मला शुभेच्छा निवृत्ती द्यावी, अशी मागणी पोलीस निरीक्षक रविंद्र पेरगुलवार यांनी पत्राद्वारे केली आहे.
पोलीस निरीक्षक पेरगुलवार यांनी महासंचालक यांच्याकडे न्याय मागितला आहे. 24 जुलै 2019 दरम्यान अंबाजोगाई येथे पार पडलेल्या क्राइम मिटिंगमध्ये मला पोलीस अधीक्षक म्हणाले की, तुम्हाला डोके नाही, तुम्ही परीक्षा कशी पास झालात, असे म्हणून अपमान केले असल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय परळी येथे एका दौऱ्या दरम्यान मला अपमानास्पद वागणूक दिली. तसेच 2 जुलै रोजी देखील असाच प्रकार घडला होता. पोलीस अधीक्षकांच्या सततच्या छळामुळे माझे स्वास्थ बिघडले आहे. आजारी रजेवर गेल्यावर त्या काळातील वेतनही केले गेलेले नाही. पोलीस अधीक्षकांकडून होणाऱ्या छळामुळे मी त्रस्त असल्याचे पेरगुलवार यांनी म्हटले आहे. या तक्रारीमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.