बीड - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ६ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी बीड जिल्हा दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रचारार्थ ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान गोपीनाथ मुंडेंनी बीडमध्ये मोदी यांची प्रचारसभा नाकारली होती. यामुळे २०१४ च्या गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारतंत्राची आठवण बीडकरांना होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बीड दौऱ्यावर येण्याची शक्यता; ६ एप्रिलला अंबाजोगाईत सभा - munde
प्रीतम मुंडे यांची थेट लढत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनवणे यांच्याशी होत आहे. लोकसभा निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी अवघे ४ दिवस उरले आहेत.
२०१४ मध्ये नरेंद्र मोदींची संपूर्ण देशात लाट होती. तरीदेखील बीडमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा गोपीनाथ मुंडे यांनी नाकारली होती. जिल्ह्यात मुस्लीम वर्गदेखील त्यांचा मतदार होता. या मतदारांवर काही विपरित परिणाम होऊ नये, यासाठी त्यांनी मोदींची सभा नाकारल्याचे बोलले जाते. याबाबत त्यांनी एका पत्रकार परिषदेत बोलून देखील दाखवले होते. मात्र, यावेळी प्रीतम मुंडेंच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी बीड जिल्हा दौऱ्यावर येण्याची शक्यता असून ते अंबाजोगाई येथे जाहीर सभा घेणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.