बीड - पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 ऑक्टोबरला परळी शहरात प्रचार सभा घेणार आहेत. मोदी सभा घेतात खरतर हे जिल्ह्याचे भाग्य आहे. भविष्यात आम्ही बीड जिल्ह्याच्या विकासाचे अनेक प्रकल्प पंतप्रधानांकडून मार्गी लावून घेऊ शकतो. मात्र, विरोधकांना मोदी यांच्या सभेमुळे धडकी भरली आहे. आता त्यांना काहीही भास होत असल्याची टीका पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर केली आहे. सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात मुंडे बहीण भावांची लढत होत आहे. प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. 17 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी परळीत सभा घेणार आहेत. त्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली.
हेही वीची -बॉम्बस्फोटाचा आरोप होऊनही सरकार भागवतांना का पकडत नाही - प्रकाश आंबेडकर
यावेळी त्या म्हणाल्या की, पवारांना वारंवार जिल्ह्यात यावे लागते हे धनंजय मुंडे साठी चांगले लक्षण नाही. तरी देखील आम्ही कधी पवार परळीत का येत आहेत असे म्हटले नाही. मग विरोधक पंतप्रधान मोदी हे परळीत येतायत तर टीका का करतात? असा सवाल पंकजा मुंडे यांनी यावेळी उपस्थित केला. दोन दिवसांपूर्वी घाटनांदूर येथील एका कार्यक्रमात धनंजय मुंडे म्हणाले होते की, आता अमेरीकेचे ट्रम्प जरी माझ्या विरोधात प्रचार करण्यासाठी परळीत आले, तरी माझा पराभव कोणी करू शकत नाही. त्यांच्या या वक्तव्याला पंकजा मुंडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत उत्तर दिले.