बीड - अनेक राजकीय स्थित्यंतरात आपण टिकून राहिलो. सर्वसामान्यांची सेवा हेच ध्येय म्हणून आम्ही ३० वर्षे जिल्ह्याच्या विकासासाठी काम केले. जनतेसाठी आपण एखादी भूमिका मांडतो तेव्हा सरकार दरबारी त्याचा विचार व्हायला हवा. परंतु, तसे झालेच नाही. सापत्न भावाची वागणूक आणि पक्षाकडून होणारी हेळसांड यामुळे मला भूमिका बदलण्यास भाग पडले. त्यामुळे मी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे.
भूमिका मांडली आता मतदानरुपी पाठबळ द्या; आमदार क्षीरसागर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
जिल्ह्याचा विकास हवा की जिल्हा बकास हवा याचा विचार करा, मी भूमिका मांडली आहे आता मतदानरुपी पाठबळ तुम्ही द्या, भाजपच्या डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, असे कळकळीचे आवाहन आ. जयदत्त क्षीरसागर यांनी मतदारांना केले आहे.
बीड लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघाची ठिकाणी सभा व कॉर्नर बैठक घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. बीड परिसरात मतदारांशी संवाद साधताना आमदार जयदत्त क्षीरसागर पुढे म्हणाले की, बीड विधानसभा मतदारसंघाचा विकास करताना कसलाही भेदभाव न करता या सरकारने निधी दिला. मी विरोधी पक्षाचा असतानादेखील अनेक प्रकल्प मार्गी लागले याचा मोठा लाभ बीड जिल्ह्यातील जनतेला होत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्या पाठीशी जनतेने उभे राहावे असे, आवाहन क्षीरसागर यांनी केले. मागील आठ दिवसापासून जयदत्त क्षीरसागर हे ठिकठिकाणी कॉर्नर बैठक घेऊन आपली भूमिका मांडत आहेत.
बीड लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आहे. याच दरम्यान आ. जयदत्त क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला. यामध्ये पेंटर संघटना खासगी, वस्तीगृह चालक, कोचिंग क्लासेस चालक, शिक्षक संघटना यांचा समावेश आहे.