बीड :दुचाकीवरुन कट मारल्याच्या कारणावरुन एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना बीडमधील माजलगाव शहरात घडली. माजलगाव शहरातील मंजरथ रोडवरील कॉलनीत गुरुवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. खून झालेला व्यक्ती आणि आरोपी हे एकाच गल्लीत राहत होते.अनिल सर्जेराव शेंडगे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शेंडगे हे धारूर येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते. या हत्येप्रकरणी माजलगाव पोलिसांनी तेजस पंढरीनाथ शिंदे या तरुणाला अटक केली आहे. इतर दोन आरोपी फरार आहेत.
कट मारला म्हणून खून : अनिल शेंडगे हे धारूर तालुक्यातील चिखली येथील मूळ रहिवासी होते. ते आपल्या कुटुंबासह माजलगावमधील मंजरथ रोडवर येथीलपाटील कॉन्ट्रॅक्टर यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहत होते. नोकरीच्या निमित्ताने अनिल शेंडगे हे धारूर येथे दररोज ये-जा करत होते. गुरूवारी रात्री 8 वाजता अनिल शेंडगे जेथे राहत होते, त्याच गल्लीतून तेजस पंढरीनाथ शिंदे हा दुचाकीवरुन जात होता. यावेळी दुचाकीवरुन कट का मारला, असा प्रश्न शेंडगेने पंढरीनाथ शिंदेला केला.या कारणावरुन अनिल शेंडगे आणि तेजस शिंदे यांच्यात वाद झाला.त्यांनतर शेंडगे यांना रात्री 8 वाजता मोबाईलवर फोन करुन रस्त्यावर बोलावून घेतले. शेंडगे यांच्या गल्लीत राहणारे मंगेश पंढरीनाथ शिंदे, तेजस पंढरीनाथ शिंदे आणि कृष्णा उर्फ सोन्या राऊत हे तिघे शेंडगे यांना शहरातील तबल्याच्या दुकानजवळ घेऊन गेले. तेथे आल्यानंतर अनिल शेंडगेंच्या डोक्यावर दगडाने हल्ला करत त्यांचा खून केला. त्यांनतर अनिल शेंडगे यांचा मृतदेह त्यांच्या घरासमोर आणून टाकून दिला. नागरिकांना शेंडगे यांचा मृतदेह दिसून आल्यानंतर शेंडगेंच्या नातेवाईकांना त्याची माहिती देण्यात आली. त्यांनतर काही वेळात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.