परळी वैजनाथ (बीड)- सध्या राज्यभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावत आहेत. तर काही रुग्ण उपचार मिळून देखील कोरोनाच्या युद्धात जीव गमावताना दिसत आहेत. मात्र अशाही परिस्थितीत वयाची 80 पार केलेल्या परळीच्या ज्येष्ठ दाम्पत्याने कोरोनावर मात केली आहे. विशेषतः यांची बायपास शस्त्रक्रिया झालेली, व्हेंटिलेटरवर ठेवून दहा दिवस उपचार तरीही न डगमगता त्यांनी कोरोनाला परतवून लावले आहे.
खचुन न जाता उपचाराला प्रतिसाद द्यावा
परळीच्या जोशी काका आणि काकूंनी आत्मविश्वास व रोगप्रतिकार शक्तीच्या जोरावर कोरोनाचा सामना केला आहे. खचुन न जाता उपचाराला प्रतिसाद द्यावा, हे दिवसही जातील असा अनमोल सल्ला त्यांनी सर्वांना दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, परळीतील सेवानिवृत्त शिक्षक सर्व परिचित असलेल्या रमाकांतराव जोशी व विजयाबाई जोशी दाम्पत्याचे वय 80 पार आहे. या दोघांचीही यापूर्वी बायपास सर्जरी झाली आहे. त्यातच कोरोनाने त्यांना गाठले, एचआरसीटी स्कोअर वाढला, वयोमानानुसार प्रकृतीच्या अन्य समस्याही होत्याच. उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल झाले.
वय जास्त असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करणे गरजेचे असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते परळीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाले. उपचार सुरू असताना त्यांना काही दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. दहा दिवस त्यांनी उपचार घेतले. त्यानंतर घरी विलगीकरणात राहुन काळजी व उपचार घेतले.बघता-बघता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. आता त्यांची प्रकृती उत्तम असून, त्यांची कोरोना चाचणीही निगेटिव्ह आली आहे.
जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर या दांपत्याने कोरोनाला हरविले आहे. विपरीत परिस्थितीत कोरानावर मात करणारे हे ज्येष्ठ नागरिक कोरोना झाला म्हणून घाबरून व भेदरुन जाणारांसाठी 'दिशादर्शक'ठरले आहेत. केवळ प्रचंड धैर्य, आत्मविश्वास व रोगप्रतिकारशक्ती या ज्येष्ठांच्या जिंकण्याचे कारण ठरली. सध्याच्या भयावह स्थितीत कोरोनाबाधितांना आदर्श ठरावा असा कोरोनावर विजय जोशी दाम्पत्याने मिळविला आहे.