डॉ. संतोष मुंडे, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) परळी (बीड) : परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अभिनेते सुनील शेट्टी यांच्या टोमॅटोच्या किमतीवरील वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यांनी सुनील शेट्टी यांना टोमॅटोचे पार्सल पाठवून सुनिल शेट्टी शेतकरी द्रोही असल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी केली. टोमॅटोच्या वाढत्या किंमतीबाबत सुनील शेट्टी यांनी केलेल्या वक्तव्याची निंदा करत राष्ट्रवादीचे नेते डॉ. संतोष मुंडे यांनी त्यांना परळीतून टोमॅटोचे पार्सल पाठवले आहे.
काय म्हणाले होते सुनील शेट्टी? : अभिनेते सुनील शेट्टी एका मुलाखतीत म्हणाले होते की, 'टोमॅटोच्या वाढत्या किंमतीचा परिणाम माझ्या स्वयंपाक घरावरही होऊ लागला आहे. आम्ही ताजे उगवलेले अन्न खाण्यावर विश्वास ठेवतो. टोमॅटोचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत आणि त्याचा परिणाम आमच्या स्वयंपाक घरावरही झाला आहे. आजकाल मी टोमॅटो कमीच खातो. लोकांना वाटेल की मी सुपरस्टार असल्याने या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होणार नाही, पण हे खोटे आहे. आम्हालाही अशा समस्यांना सामोरे जावे लागते', असे ते म्हणाले होते.
'तेव्हा सुनील शेट्टी सारखे लोक झोपलेले असतात का?' : यावरून आता परळीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुनील शेट्टी यांचा निषेध केला. 'लेखक भास्कर चंदनशिवे त्यांच्या 'लाल चिखल' कथेत म्हणतात त्याप्रमाणे जेव्हा रुपया, दोन रुपये किलो भाव टोमॅटोला असतो तेव्हा कोणी शेतकऱ्यांच्या कष्टाची पर्वा करत नाही. तेव्हा कोणी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत नाही. तेव्हा सुनील शेट्टी सारखे लोक झोपलेले असतात का?', असा संतप्त सवाल डॉ. संतोष मुंडे यांनी केला आहे.
म्हणून टोमॅटोचे पार्सल पाठवले : मुंडे पुढे म्हणाले की, 'एकेका चित्रपटासाठी करोडो रुपये घेणाऱ्या सुनील शेट्टींकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. त्यासाठी त्यांच्याकडे पैसे असतात. त्यांचे काही हॉटेल्सही आहेत. फक्त त्यातून ते वर्षाला करोडो रुपये कमावतात. मात्र कधीतरी शेतकरी चार पैसे कमावत असेल तर यांच्या सारख्या शेतकरी द्रोही लोकांच्या पोटात दुखते. त्यामुळे त्यांना आम्ही टोमॅटोचे पार्सल पाठवत आहे', असे संतोष मुंडे म्हणाले.
हेही वाचा :
- Ravikant Tupkar On Sunil Shetty: टोमॅटो खाल्ले नाही तर सुनील शेट्टी मरणार नाही - रविकांत तुपकर
- Suniel Shetty : सुनिल शेट्टीला टोमॅटो महाग, नेटीझन्सनी केली खरडपट्टी