परळी वैजनाथ (बीड) - पाणीपुरीचे पैसे मागितल्याने भेळ विक्रेत्याला तिघांनी मारहाण केली. त्यानंतर गल्ल्यातील दोन हजार रुपये हिसकावून पळ काढला. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ज्ञानेश्वर अशोक शिवगण (रा. माणिकनगर, परळी) असे मारहाण झालेल्या भेळ विक्रेत्याचे नाव आहे.
पाणीपुरीचे पैसे मागितल्याने भेळ विक्रेत्याला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल - Parali PI Ashok Kharat
भेळ गाड्यावरील गल्ल्यात दोन हजार रुपये ठेवले होते. आरोपीने हे पैसे काढून घेत भेळ विक्रेत्याला मारहाण केली.

ज्ञानेश्वर शिवगण हे गुरुवारी एका खासगी रुग्णालयासमोरील गाड्यावर नेहमीप्रमाणे भेळ व पाणीपुरी विकत होते. दुपारी एक वाजता दुचाकीवरुन (क्र. एमएच ४४ - २०५५) दत्ता मुंडे (रा. कन्हेरवाडी, ता. परळी) व अन्य दोन अनोळखी तेथे आले. त्यांनी पानीपुरी घेऊन पार्सल घेतले. त्यानंतर पैसे न देताच ते निघाले. यावेळी भेळविक्रेत्याने पैशांची मागणी केली असता, 'तुझे पैसे देत नाही, काय करायचे ते कर' असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, शिवगण यांनी दुधाची उधारी देण्यासाठी दोन हजार रुपये गल्ल्यात ठेवले होते. ते बळजबरीने काढून आरोपींनी पुन्हा मारहाण केली. यावेळी त्यांच्याकडे कामाला असलेल्या ज्योतीराम कांबळे व शेजारच्या आईस्क्रीम विक्रेत्यानेमध्ये पडत मारहाण थांबवली. त्यानंतर तिघांनीही तेथून दुचाकीवरुन धूम ठोकली. ज्ञानेश्वर शिवगण यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक खरात हे करीत आहेत.