बीड- विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता शनिवारी लागू झाली. त्यामुळे सर्वच पक्षांचे उमेदवार कार्यकर्त्यांची बैठक घेण्यासाठी सरसावले आहेत. बीड जिल्ह्यातील लक्षवेधी लढत ठरत असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठी धनंजय मुंडे हे व्यूहरचना आखत आहेत. सोमवारी परळी येथे धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व बुथ प्रमुखांची बैठक निश्चित केली आहे. याच बैठकीतून धनंजय मुंडे प्रचाराची व्यूहरचना ठरवणार असल्याने या बैठकीची परळी विधानसभा मतदारसंघात जोरदार चर्चा होत आहे. परळी विधानसभा मतदार संघामध्ये बहिण-भाऊ यांच्यात थेट लढत होणार असल्याने याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
परळीत बहीण-भावांची प्रतिष्ठा पणाला; धनंजय मुंडे सोमवारी ठरवणार प्रचाराची व्यूहरचना - parali vidhansabha
परळी विधानसभा मतदार संघामध्ये बहिण-भाऊ यांच्यात थेट लढत होणार असल्याने याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
परळी विधानसभा मतदारसंघात 2014 मध्ये भाजपच्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांना पराभूत केले होते. त्यानंतर पाच वर्षाच्या भाजपच्या सत्ताकाळात अत्यंत घडामोडी झाल्या. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे, परळी विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये धनंजय मुंडे यांच्या गटाने बाजी मारलेली आहे. आज घडीला परळी पंचायत समिती व परळी तालुक्यातील जिल्हा परिषद गट यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांचे वर्चस्व आहे. याउलट बीडच्या पालकमंत्री म्हणून पाच वर्ष काम करत असताना कोट्यावधी रुपयांचा निधी परळी विधानसभा मतदार संघासाठी खेचून आणला असल्याचे पंकजा मुंडे या जाहीर भाषणातून सांगतात. आता जस-जसे निवडणुकीचे वातावरण तापू लागेल तस-तसे प्रचाराचे वेगवेगळे मुद्दे समोर आणले जातील. परळी विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. 2014 ची निवडणूक धनंजय मुंडे हे सुमारे 26 हजार मतांनी हरले होते. आता पुन्हा एकदा परळी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून पंकजा मुंडे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
पंकजा यांच्यासाठी बहिण तर धनंजय मुंडे यांच्यासाठी पत्नी प्रचारासाठी मैदानात
भाजपचा परळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासाठी त्यांच्या बहिण खासदार प्रीतम मुंडे प्रचाराच्या मैदानात उतरलेल्या आहेत. मागील पंधरा दिवसापासून त्या परळी विधानसभा मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधत आहेत. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्यासाठी त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे या मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत. त्या मागील महिनाभरापासून परळी विधानसभा मतदारसंघात फिरत आहेत. बहिण-भावांच्या उमेदवारीने येथील निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.