महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा परळीत कोरोना रुग्णांसाठी 3 मे पासून सेवायज्ञ

परळी मतदारसंघातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, उपयायोजना करण्यासाठी त्यांनी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी व्हर्च्युअल बैठक घेऊन संवाद साधला.  या बैठकीत त्यांनी कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी 3 जानेवारी पासून सेवा यज्ञ सुरू करण्याचे जाहीर केले.

परळीत कोरोना रुग्णांसाठी 3 मे पासून सेवायज्ञ
परळीत कोरोना रुग्णांसाठी 3 मे पासून सेवायज्ञ

By

Published : Apr 26, 2021, 6:58 AM IST

परळी (बीड)- कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस वाढत जात आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी परळीत कोरोना रुग्णांसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून 'सेवा यज्ञ' सुरू करण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत लक्षणे नसलेल्या परंतू कोरोना पाॅझिटिव्ह असलेल्या रुग्णांसाठी विलगीकरण (आयसोलेशन) केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच बाधित महिला रुग्णांच्या घरी जेवणाचे डबे पोहोचविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार डाॅ. प्रितम मुंडे या मुंडे भगिनी सध्या कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने क्वारंटाईन आहेत. मात्र परळी मतदारसंघातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, उपयायोजना करण्यासाठी त्यांनी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी व्हर्च्युअल बैठक घेऊन संवाद साधला. या बैठकीत त्यांनी कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी 3 जानेवारी पासून सेवा यज्ञ सुरू करण्याचे जाहीर केले.

यावेळी बोलतांना पंकजा मुंडे यांनी सर्वप्रथम कोरोनाकाळात सर्वांना स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घेण्याचे आवाहन केले. येणाऱ्या काळात कोरोनाला लढा देत असताना कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून समाजसेवा करण्याचे मूर्तीमंत उदाहरण बनावे. प्रितम यांनी खासदार या नात्याने स्वतः लक्ष घालून कोविड केंद्रात जाऊन रुग्णांना धीर दिल्याचे त्या म्हणाल्या.

सेवायज्ञ सुरू करणार-

कोरोना काळात रुग्णांसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान सेवा यज्ञ सुरू करणार आहे. दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या ३ मे पुण्यतिथीदिनापासून ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या ३ जून पुण्यतिथी पर्यंत हा सेवा यज्ञ होणार आहे. आवश्यकता भासल्यास तो पुढेही चालू ठेवणार आहोत. याअंतर्गत लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी आयसोलेशन सेंटर तसेच बाधित महिलांच्या घरी जेवणाचा डबा पोहोचविण्यात येईल, त्याचबरोबर कोरोना पेशंट असलेल्या घरात ज्यांना आवश्यक आहे, त्यांनाही जेवणाचा डबा देणार असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. ही जबाबदारी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान घेणार असल्याचे सांगताच, काही जणांनी या यज्ञात आपआपल्या परीने योगदान देऊ असे सांगितले.

वैद्यनाथ देवल कमिटीचे राजेश देशमुख, जवाहर शिक्षण संस्थेचे जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ बँकेचे अशोक जैन यांनी संस्थेच्या माध्यमातून रुग्णांना संपूर्ण सहकार्य करण्याचा तसेच डाॅ. हरिश्चंद्र वंगे, डाॅ. शालिनी कराड, डाॅ. संदीप घुगे, डाॅ. विवेक दंडे, डाॅ. एल. डी. लोहिया, डाॅ. दिपक मुंडे, डाॅ. यशवंत देशमुख यांनीही सहकार्य करण्याचा शब्द दिला. महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीस जयश्री मुंडे यांनी स्वतःचे वाहन उपलब्ध करून देऊ असे सांगितले.

माय माऊलींची खास काळजी

पंकजाताई मुंडे यांनी या सेवा यज्ञात माय माऊलींची खास काळजी घेण्याचे ठरवले आहे. घरात आजारी पेशंट असल्यास अथवा स्वतः महिला पाॅझिटिव्ह आल्यास घरातली महिला चुलीसमोर बसू शकत नाही, कुटुंबासमोर जेवणाचा प्रश्न उभा राहतो. अशावेळी संपूर्ण कुटुंबाला जेवणाचा डबा घरपोच देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या समवेतच कोविड पेशंट असलेल्या घरात ज्यांना आवश्यकता भासेल त्यांना आणि ग्रामीण भागातील पेशंटला सुध्दा जेवणाची सोय करू असे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details