बीड - मी खचले नाही. स्वाभिमानी असणं हे सन्मानाचं लक्षण आहे. पराक्रम, परिश्रम, सत्य आणि संघर्ष ही शस्त्रे घेऊन भविष्याची वाटचाल करणार आहे, मला फक्त तुमची साथ हवी आहे, संघर्षाच्या अग्नितूनही आपण बाहेर निघू आणि अत्यंत आत्मविश्वासाने वाटचाल करू, असे सांगत तुम्ही राहणार ना माझ्यासोबत? अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी आज फेसबुक लाईव्ह वरून कार्यकर्त्यांना साद घातली आहे.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज फेसबुक लाईव्हवरून जनतेशी संवाद साधला. मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी समर्पित सेवेचा यज्ञ करण्याचे आवाहन केले.
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या, की आजचा दिवस काळाने आपल्यावर आणलेला आहे. आपल्या महत्त्वाच्या व्यक्तीला आजच्या दिवशी आपण गमावलं आहे. म्हणून ३ जून आपल्यासाठी ‘काळा दिवस’ आहे. मुंडे साहेबांचे संस्कार असे होते, की हरायचे नाही, लढायचं, रुकायचे नाही, कोणापुढे कधीही झुकायच नाही, हे मुंडे साहेबांनी आपल्या सर्वांना शिकवले. मुंडे साहेबांच्या या शिकवणुकीला अनुसरून जो जो संघर्ष करतो त्यासाठी हा एक ‘प्रेरणा दिन’ आहे.
मला आज खूप दु: ख होतय. कारण मी आज मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेवू शकले नाही. आज मुंबईत वादळाची स्थिती असल्याने नेटवर्क नाही, अशा नेटवर्कच्या समस्या अनेकदा येतात, पण तुमच्या माझ्यातील कनेक्शन कोणीही तोडू शकत नाही. मुंडे साहेबांच्या अनेक आठवणी आहेत, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, खासदार प्रीतम मुंडे यांनी समाधीस्थळी येऊन दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.