बीड- 'मी विधानसभा निवडणुकीत हरले, पराभूत झाले. पण माझ्यापेक्षा कार्यकर्ते हे जास्त दुखावले गेले. लोकनेते मुंडे साहेब आपल्यातून गेल्यापेक्षा हे मोठे दु:ख नाही. 'जिंदगी के रेस में जो आपको दौडकर हरा नहीं पाते है, वो आपको तोड कर हराने की कोशिश करते है' त्यामुळे माझ्या माणसांना कुणीही तोडलेले मी खपवून घेणार नाही. आपल्या एकीची वज्रमूठ कायम ठेवा, असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज भगवान भक्तीगडावरील 'आपला दसरा ' कार्यक्रमात सांगितले. आपल्या तडाखेबंद भाषणात चौकार, षटकारांनी त्यांनी विरोधकांना पुरते घायाळ केले.
दरवर्षीप्रमाणे भाजपा नेत्या पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा सावरगाव ता. पाटोदा येथे भगवान भक्तीगडावर मोठ्या उत्साहात पार पडला. पण, कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे त्यांनी मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फेसबुक लाईव्ह करून 'ऑनलाईन' मेळावा घेतला. माजी मंत्री महादेव जानकर, माजी आमदार भीमराव धोंडे, केशवराव आंधळे, आ. मोनिका राजळे, आ. मेघना बोर्डीकर, खासदार डाॅ. भागवत कराड, प्रवीण घुगे, अक्षय मुंदडा, निळकंठ चाटे, नगरचे अरुण मुंडे, लातूर जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, डाॅ. कायंदे तसेच ऊसतोड कामगार व मुकदम यावेळी उपस्थित होते.
सावरगाव येथे पोहोचताच पंकजा मुंडे यांनी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मस्थळावर जाऊन वंदन केले. त्यानंतर विधिवत पूजा करून आशीर्वाद घेतले. ऑनलाईन मेळाव्यास संबोधित करताना त्या म्हणाल्या की, भगवानगडावर येत असताना महिला आणि कार्यकर्त्यांनी माझे स्वागत केले. भगवान बाबांची मूर्ती आणि लोकनेते मुंडे साहेबांच्या कीर्तीमुळे माझे स्वागत होत आहे. आज मी एका ग्रामपंचायतची सदस्यही नाही. पण तरीही महिलांनी ठिकठिकाणी माझं स्वागत केलं. तुम्हाला माझी काळजी आणि मला तुमची काळजी हीच, आपली शक्ती आहे. आता पद, प्रतिष्ठा, सत्ता नसतानादेखील आपल्याला एकीची वज्रमुठ कायम ठेवायची आहे, असेही पंकजा म्हणाल्या. 'पंकजा मुंडे घरातून बाहेर पडणार नाही, अशी चर्चा होती. भगवान गडावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली. पण, कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही. भगवान गडावर दर्शन घेतल्याशिवाय माझा दसरा मेळावा पूर्णच होऊ शकत नाही. तुम्ही माझ्यासाठी मास्क काढून रिस्क घेतली, म्हणून मीही तुमच्यासाठी मास्क काढून उभे राहिले' असं सांगत पंकजांनी मास्क न घालता भाषण केले.
सरकारने शेतकऱ्यांच्या पॅकेजची रक्कम वाढवावी -
नांदेडमध्ये अतिवृष्टी भागाची पाहणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. पण, १० हजार कोटींमध्ये शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पॅकेजची रक्कम आणखी वाढवावी, अशी मागणी पंकजा मुंडेंनी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना दसरा मेळाव्याच्या शुभेच्छाही दिल्या. 'कोरोनाचे सगळे नियम तोडून मी उसतोड कामगारांच्या भेटीसाठी निघाले होते. तेव्हा मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता. ते मला हक्काने रागवतात. ते माझे मोठे भाऊ आहेत. ऊसतोड कामगारांसाठी किती आदळआपट करणार, असे मुख्यमंत्र्यांनी विचारले. तेव्हा सांगलीत ऊसतोड कामगार अडकले आहेत, त्यांची सुटका करा असा विषय त्यांच्या कानी टाकला, त्यांनीही सकारात्मक निर्णय घेतला आणि लगेच सांगलीतून ऊसतोड कामगारांना घरी जाता आले, असा किस्साही त्यांनी सांगितला.