बीड- मागील 15 वर्षे राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता असताना बीड जिल्ह्याने पारतंत्र्य भोगले. पण, गेल्या 5 वर्षात सत्तेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून जी विकासाची कामे मी केली. त्यातून हा जिल्हा विकासाच्या बाबतीत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याला परत पारतंत्र्यात टाकू नका. जातीपातीच्या पलिकडे जाऊन काम करणारे स्वाभिमानी नेतृत्व जपा, असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री व भाजप महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे यांनी केले. त्यांनी जिल्ह्यातील सर्व जागांवर पुन्हा भाजप महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा -मतदारांना उल्लू बनवू नका - विजयसिंह पंडित
परळी मतदारसंघातील अंबाजोगाई तालुक्यातील बुथ प्रमुख व विविध समित्यांच्या प्रमुखांचा मेळावा आज शहरातील साधना मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला, यावेळी मुंडे बोलत होत्या.
पुढे बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, परळी विधानसभेची निवडणूक मतदारसंघाच्या अस्तित्वाची व भवितव्य ठरविणारी आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस आपल्यासाठी महत्वाचे आहेत. कार्यकर्त्यांनी सजग राहून काम करावे. बुथ यंत्रणेतील कार्यकर्त्यांनी आपापली जबाबदारी नियोजनबध्द रितीने पार पाडावी, असे मुंडे यांनी सांगितले.
हेही वाचा - अप्रत्यक्ष भाजपला मदत करणारे प्रत्यक्ष मदतीसाठी भाजपात गेले -धनंजय मुंडे
मागील 15 वर्षे राष्ट्रवादीने सत्ता असूनही जिल्ह्यासाठी काहीच केले नाही. विकासाची कोणतीही योजना आणली नाही, येथील जनता पारतंत्र्यात असल्यासारखी होती. परंतु, मी गेल्या 5 वर्षात परळी मतदारसंघ व जिल्ह्यात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून जिल्ह्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून दिले. माझ्या चांगल्या कामामुळे राष्ट्रवादीची बोगसगिरी देखील बंद झाली. चांगले नेतृत्व टिकले तरच त्या भागाचे भविष्य उज्वल असते, त्यामुळे चांगले काम करणाऱ्या नेतृत्वाला जपा, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राह, असे आवाहन मुंडे यांनी केले.
राष्ट्रवादीचे राजाभाऊ औताडे भाजपत-
राष्ट्रवादी काँग्रेसचे सेलू अंबा येथील राजाभाऊ औताडे, घाटनांदूरचे पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र वालेकर, सायगावचे ग्रामपंचायत सदस्य रफीक कुरेशी तसेच वाघाळा, पिंपळा धायगुडा येथील ग्रामपंचायत सदस्यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी या सर्वांचे भाजपमध्ये स्वागत केले. यावेळी बोलतांना औताडे यांनी पंकजा मुंडे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचे सांगितले.
हेही वाचा - 'आईचा शब्द न पाळणारे मतदारांशी काय प्रामाणिक राहणार?'
यावेळी महिला आयोगाच्या सदस्या गयाताई कराड, भाजपचे तालुकाध्यक्ष नेताजी देशमुख, प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी, अच्यूत गंगणे, शामराव आपेट, सुनील लोमटे, जीवनराव किर्दंत, गणेश कराड, कमलाकर कोपले, दिलीप काळे, अविनाश मोरे, संजय गिराम, विलास जगताप, नारायणराव केंद्रे, प्रदीप गंगणे, वैजनाथ आप्पा गारठे, बिभीषण गिते, अण्णासाहेब लोमटे आदी यावेळी उपस्थित होते.