बीड - विख्यात सिनेअभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने, महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्यासाठी आयोजित 'सत्यमेव जयते वॉटर कप 2019' या स्पर्धेमध्ये बीडमधील, लिंबागणेश जिल्हा परिषद गटातील 'देवऱ्याची वाडी' गावाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. आज (रविवारी) पुण्यातील बालेवाडी येथे या पुरस्काराचा वितरण समारंभ पार पडला.
बीडमधील 'देवऱ्याची वाडी' गावाने 'वॉटर कप २०१९' स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला पुण्यातील बालेवाडी येथे या स्पर्धेतील विजेत्या ग्रामपंचायतींना सिनेअभिनेता अमीर खान, आदर्शगाव हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, दिग्दर्शक नागराज मंजुळे, आमिर खान यांच्या पत्नी किरण राव, प्रसिध्द गायक अजय-अतुल यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीसांचे वितरण करण्यात आले.
राज्यात लिंबागणेश जि.प. गटातील 'देवर्याची वाडी' या गावाने तिसऱ्या क्रमांकाचे 13 लाख 50 हजारांचे रोख बक्षीस मिळवले आहे. या पुरस्कारामुळे बीड जिल्ह्याची मान उंचावली आहे. जिल्ह्यातील देवऱ्याची वाडी, मांडवखेड, तळेगांव आणि गुंदावाडी या गावांमध्ये बक्षीस मिळवण्यासाठी विशेष चढाओढ होती. देवऱ्याची वाडी येथील ग्रामस्थांनी एकजुटीने केलेल्या श्रमदानाचे फळ म्हणून देवऱ्याची वाडी ग्रामस्थांना हा बहुमान मिळालेला आहे.
हा बहुमान माझ्या जिल्हा परिषद गटातील देवऱ्याची वाडीला मिळाल्यामुळे हा आनंद माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. या सर्व ग्रामस्थांचे मी मन:पुर्वक अभिनंदन व कौतुक करते. असे मत यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयश्री मस्के यांनी व्यक्त केले.
पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनामुळे अनेक खेड्या-पाड्यांत पाणी अडवण्याची स्पर्धा आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना यांमध्ये ग्रामस्थ उत्साहाने भाग घेऊन ते कार्य सफल करत आहेत. देवऱ्याची वाडीने पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत बक्षीस जिंकून अत्यंत स्तुत्य काम केलेले आहे. त्यांच्या सहभागामुळे मलाही देवऱ्याची वाडी येथे श्रमदान करण्याची संधी प्राप्त झाली. देवऱ्याची वाडीचे यश हे जिल्ह्यातील इतर खेड्यांसमोर आदर्श आहे. या ग्रामस्थांचे अनुकरण करून इतर गावातील ग्रामस्थांनी आपल्या गाव-शिवारात पडणारे पाणी अडवून त्याचे नियोजन करण्यासाठी सहभाग घेतला पाहिजे. असे मत भाजपचे युवा नेते राजेंद्र मस्के यांनी यावेळी व्यक्त केले.