बीड- जिल्ह्यातील केज व माजलगाव विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांना डावलून नव्या चेहऱ्याला उमेदवारी देण्याचे संकेत आहेत. उमेदवारांची यादी तयार असली तरी पितृपंधरवडा संपल्यानंतरच केज, माजलगावसह बीड जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारांची यादी भाजप जाहीर करणार असल्याचे एका भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे. केजमधून भाजप नमिता मुंदडा यांना उमेदवारी देणार की, संगीता ठोंबरे याच पुन्हा रिंगणात उतरणार याची उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा - या आधीही अजित पवारांनी तडकाफडकी दिला होता राजीनामा !
राष्ट्रवादी काँग्रेसचे आष्टी विधानसभा मतदारसंघ वगळता इतर पाच उमेदवारांची नावे स्वतः शरद पवार यांनी जाहीर केलेली आहेत. मात्र, जाहीर केलेल्या पाच उमेदवारांपैकी केज विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिलेल्या नमिता मुंदडा या भाजपच्या वाटेवर आहेत. याशिवाय विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांच्याबद्दल केज विधानसभा मतदारसंघात नाराजी आहे. त्यामुळे भाजपच्या वाटेवर असलेल्या नमिता मुदडा यांना भाजप उमेदवारी देण्याची शक्यता आहे. मात्र पितृपंधरवडा संपल्यानंतरच भाजप केज व माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारांची नावे जाहीर करणार आहेत. केज विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांना उमेदवारी देण्याबाबत भाजप काय निर्णय घेते हे पाहण्यासाठी थोडा वेळ जात लागणार आहे.
हेही वाचा - मुंबईवर पुन्हा 26/11 सारखा हल्ल्याचा प्रयत्न, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा गौप्यस्फोट
राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी पाहून नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी नाकारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे हे नमिता मुंदडा यांचे काम करणार नाहीत. अशी शक्यता मुंदडा कुटुंबीयांना वाटत असल्याने त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी नाकारली आहे. मागील आठवडाभरापासून नमिता मुंदडा यांच्या फेसबूक पेजवर प्रसिद्ध होत असलेल्या जाहिरातीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा फोटो नाही. घडामोडीनंतर मुंदडा कुटुंबीय भाजपच्या वाटेवर आहेत. अद्यापपर्यंत केज व माजलगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारांचे नाव भाजपने जाहीर केलेले नाही. या सगळ्या परिस्थितीमुळे कार्यकर्ते मात्र संभ्रमात असलेले असल्याचे चित्र माजलगाव विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे.
माजलगावमधून रमेश आडसकर यांचे नाव चर्चेत-
बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार आर टी देशमुख यांना डावलून रमेश आडसकर यांना उमेदवारी देण्यासंदर्भात जोरदार चर्चा होत आहे. एवढेच नाही तर आडसकर मागील एक दीड महिन्यापासून माजलगाव विधानसभा मतदारसंघात फिरताहेत मात्र, अद्यापपर्यंत रमेश आडसकर भाजपने माजलगाव मतदारसंघातील उमेदवारांचे नाव जाहीर केलेले नाही पितृपंधरवडानंतरच उमेदवार जाहीर होण्याचे सांगितले जात आहे.