नगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकारकडून शंभर कोटींचा निधी, पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान व रेल्वेमंत्र्यांचे मानले आभार - नगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकारकडून शंभर कोटींचा निधी
नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या कामाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी यासंदर्भात पंतप्रधान व रेल्वेमंत्र्यांचे आभार व्यक्त करणारे ट्विट केले आहे.
परळी (बीड) -नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या कामाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने शंभर कोटी मंजूर केले असून यामुळे कामाला आणखी गती येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे आभार" असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
बीडकरांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा असलेला नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग पूर्ण करण्यासाठी पंकजा मुंडे आणि खा.डॉ. प्रितम मुंडे सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेऊन केंद्र सरकार देखील निधीची पूर्तता करत आहे, केंद्र सरकारने केलेल्या शंभर कोटींच्या तरतुदीमुळे याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
या रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी मुंडे भगिनी वेळोवेळी पाठपुरावा करत आहेत. तसेच रेल्वेमार्गाच्या कामामध्ये त्या जातीने लक्ष देऊन आहेत. जिल्हा प्रशासन आणि रेल्वे विभागाकडून आढावा घेणे असो किंवा प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणे असो पंकजा आणि प्रितम मुंडे यांच्या तत्परतेमुळे रेल्वेमार्गाला गती मिळत आहे. परंतु हा रेल्वे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने देखील त्यांच्या वाट्याचा निधी उपलब्ध करून दयावा, अशी मागणी बीड जिल्ह्यातील नागरिकांमधून करण्यात येत आहे.