बीड - थोर भारतीय तत्वज्ञ, विद्वान आणि राजकारणी सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज १३२वी जयंती आहे. त्यांच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतात 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. जीवनाला दिशा देण्यात आणि माणसाच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा असतो. मात्र, याच शिक्षकांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. विना अनुदानित शाळांतील शिक्षक अनेक वर्षांपासून विनावेतन काम करत आहेत. जीआरकाढून देखील शिक्षकांना वेतन मिळत नसल्याच्या निषेधार्थ बीडमध्ये आज काळा शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शिक्षकांनी काळा केक कापून सरकार विरोधातील रोष व्यक्त केला.
शिक्षक दिनी काळा केक कापून विनाअनुदानित शिक्षकांकडून सरकारचा निषेध - बीड विनाअनुदानित शिक्षक न्यूज
जीवनाला दिशा देण्यात आणि माणसाच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा असतो. मात्र, याच शिक्षकांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. विना अनुदानित शाळांतील शिक्षक अनेक वर्षांपासून विनावेतन काम करत आहेत. जीआर काढून देखील शिक्षकांना वेतन मिळत नसल्याच्या निषेधार्थ बीडमध्ये आज काळा शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
मागील अनेक वर्षांपासून विनाअनुदानित शिक्षक विनावेतन काम करत आहेत. आपल्याला पगार मिळावा या मागणीसाठी त्यांनी अनेक वेळा आंदोलने केली. मागच्या वर्षी याबाबत शासनाचा जीआरही निघाला मात्र, प्रत्यक्ष वेतन मिळाले नाही. त्यामुळे संतप्त शिक्षकांनी आज काळा दिवस साजरा केला. यावेळी शिक्षकांनी हाताला काळ्या फीती लावल्या होत्या व काळे कपडेही परिधान केले होते.
दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या १९ ते २० वर्षांपासून बिन पगारी शिक्षकाची नोकरी करणाऱ्या या २२ हजार ५०० शिक्षकांच्या घरातील चुली विझल्या आहेत. शासनाने २८ फेब्रुवारी २०१८ रोजी राज्यातील १४६ उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय आणि १३ सप्टेंबर २०१९ ला १ हजार ६३८ उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसाठी १ एप्रिल २०१९ पासून २०% नुसार अनुदानाची घोषणा केली होती. त्यासाठी २४ फेब्रुवारी २०२० च्या राज्य अधिवेशनात १०६ कोटी ७२ लाख ७६ हजार रुपयाची आर्थिक तरतूदसुद्धा केली. या तरतुदीचा शासन निर्णय मंजूर होण्यासाठी शासन स्तरावर सर्व शिक्षक आमदार, सर्व पक्षाचे नेते, महाराष्ट्र राज्य विना अनुदानित कमवी कृती संघटनेचे पदाधिकाऱयांनी पाठपुरावा केला. याबाबत अर्थमंत्री अजित पवार तसेच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे विनवणी करून सुद्धा या शिक्षकांना आश्वासनापलीकडे काहीच मिळालेले नाही.