बीड- मागील तीन महिन्यांपासून बीड तालुक्यातील कुक्कडगाव हे अंधारातच आहे. ऐन गौरी गणपतीच्या सणाला गावात वीज नसल्याने सणासुदीला गावकऱ्यांची हेळसांड होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार महावितरणला निवेदने दिली. मात्र, याकडे महावितरण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या कुक्कडगाव येथे सबस्टेशन आहे. या सबस्टेशनमधून आसपासच्या गावांना सुरळीत वीजपुरवठा होतो. मात्र, कुक्कडगावातच तीन महिन्यांपासून वीज नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तसेच सरपंच वचिष्ट कुठे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कुक्कडगाव येथील नागरिक सूर्यभान खंडागळे व नंदू शिंदे या ग्रामस्थांनी म्हटले आहे, की बीड येथे जाऊन महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तरीही कुक्कडगावच्या वीज पुरवठ्याच्या प्रश्नाकडे महावितरण याकडे लक्ष देत नाही. वीज नसल्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करवा लागत आहे. शेतात पाणी सोडण्यासाठी पंप सुरू होत नाही.
हेही वाचा -बीडमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा स्वत:हून ठाण्यात
दळण आणण्यासाठी पाच किलोमीटरची पायपीट
कुक्कडगाव येथे मागील तीन महिन्यांपासून वीज पुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. दळण आणण्यासाठी देखील चार ते पाच किलोमीटर जावे लागत आहे. याशिवाय मोबाईल चार्जिंग करण्याची व्यवस्था देखील उपलब्ध नाही.