बीड -राज्यातील पोलीस उप निरीक्षकांच्या पदासाठी २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बीड तालुक्यातील भाळवणी येथील निशिगंधा नानासाहेब मस्के हिने एससी महिला प्रवर्गातून राज्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे. यामध्ये २९७ व्या रँकने तिची पोलीस उप निरीक्षकपदी निवड झाली असून भाळवणी गावातून ती पहिली पोलीस उप निरिक्षक आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतूक होत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २०१८ मध्ये पोलीस उप निरीक्षक पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल २ दिवसांपूर्वी जाहीर झाला. यामध्ये बीड तालुक्यातील भाळवणी येथील निशिगंधा मस्के या सामान्य कुटुंबातील मुलीने घवघवीत यश संपादन केले आहे. २१७ गुण घेऊन एससी महिला प्रवर्गातून तिने पहिला येण्याचा मान मिळवला आहे.
हेही वाचा -परवाना नूतनीकरणासाठी 35 हजाराची लाच घेताना सहायक आयुक्ताला रंगेहाथ पकडले
शेती व मजुरी करणारे वडील व अंगणवाडी सेविका असलेल्या आईने कष्टातून तिला शिकवले. भाळवणीच्या जिल्हा परिषद शाळेत तिने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले तर, शेजारी असलेल्या पिंपळवाडी येथील विद्यालयात दहावीचे शिक्षण घेतले. त्यानंतर निशिगंधाने बीड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातून कम्प्यूटरचा डिप्लोमा पूर्ण करुन औरंगाबादच्या पिपल्स ऐज्युकेशन सोसायटी (पीईएस) इंजिनिअरींग महाविद्यालयातून कम्प्यूटर सायन्सची पदवी घेतली. त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची परीक्षा दिली होती.
हेही वाचा -#CORONA : स्वतःचा जीव धोक्यात घालत 'त्या' करतात रुग्णांची सेवा