बीड - राजधानी दिल्ली येथे झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही व्यक्तींचा कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे मृत्यू झाल्यानंतर देशभर खळबळ उडाली होती. या कार्यक्रमात बीडमधील नऊ जणांची उपस्थिती होती. नऊपैकी दोघा जणांना बीड जिल्हा प्रशासनाने 'होम क्वॉरंटाईन' केले आहे, तर उर्वरित सात जण अद्यापही बीड जिल्ह्याच्या बाहेर असून प्रशासनाची त्यांच्यावर करडी नजर आहे.
बीड जिल्ह्यात आलेल्या त्या दोघांची तब्येत ठणठणीत असून, आरोग्य विभागाकडून त्यांची रोज तपासणी होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड जिल्हा प्रशासनाशी याबाबत संवाद साधून संपूर्ण माहिती घेतला. दिल्ली प्रकरणानंतर बीड जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, या कार्यक्रमास हजेरी लावलेल्यांची शोधाशोध करण्यात आली. बीड जिल्ह्यामधून एकूण १० जण या कार्यक्रमासाठी गेले होते. मात्र, त्यापैकी एक व्यक्ती आजारी पडल्याने कार्यक्रमात सहभागी न होता बीडला परत आला होता. उर्वरित नऊ जणांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली. त्यापैकी दोघे टप्प्या टप्प्याने बीडमध्ये परतले. त्यांचे यापूर्वीच 'होम क्वॉरंटाईन' केलेले आहे. मात्र, त्यांचा दिल्लीतील कार्यक्रमात सहभाग असल्याचे आढळल्यानंतर आता अधिक सावधगिरी बाळगली जात आहे.
त्यांच्यावर आरोग्य विभागाची नजर असून, कोणाच्याही संपर्कात न येण्यासह घराबाहेर पडू नये, अशी तंबी त्यांना देण्यात आली आहे. दोघांचीही प्रकृती ठणठणीत असून, यंत्रणेकडून त्यांच्या आरोग्याबाबत वारंवार विचारपूस केली जात आहे. या धार्मिक कार्यक्रमासाठी देशाच्या कानाकोपऱ्यासह परदेशातील नागरिक सहभागी झाले होते. यात सहभागी झालेले महाराष्ट्रातील शेकडो परत आपापल्या गावी गेले. त्यातील काही जणांना कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झाला. काही जणांना लागण झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या कार्यक्रमात उपस्थिती लावून नंतर आपापल्या गावी परतलेल्यांच्या संपर्कात आलेल्यांना धोका होऊ नये, यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु झाले आहेत.