बीड - मागील तीन महिन्यात बीड जिल्ह्यात 1300 हून अधिक कोरोना रुग्णांचे बळी गेले आहेत. बीड जिल्ह्यात मागील चार दिवसात कोरोनाची दुसरी लाटही काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. मृत्यू दरही कमी होताना दिसत आहे. भगवान बाबा प्रतिष्ठान येथील स्मशानभूमीत दोन आठवड्यापूर्वी दिवसाला 25 मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात होते. ते आता 17 ते 18 वर आलेले असल्याचे स्मशानभूमीतील कर्मचारी दीपक शेनुरे यांनी सांगितले आहे.
बीडमध्ये कोरोनाला उतरती कळा, मृत्यू दर घटला जिल्ह्यात आतापर्यंत 1877 मृत्यू
बीड जिल्ह्यात आतापर्यंत 82043 कोरोना रुग्ण आढळले. यापैकी 74467 कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत बीड जिल्ह्यात 1877 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाटही ओसरताना दिसत आहे. परंतु जिल्ह्याचा मृत्यू दर 2.28 टक्के आहे. हा दर कमी व्हायला विलंब लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मृत्यूदर कमी
बीड शहरातील भगवान बाबा स्मशानभूमी येथे गेल्या आठवड्यात दिवसाला 24 ते 25 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात होते. मात्र आता काही प्रमाणात बीड शहराचा मृत्यूदर कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता दिवसाला 17 ते 18 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. याची माहिती स्मशानभूमी येथील कर्मचारी दीपक शेनुरे यांनी दिली आहे.
दुसरी लाट ओसरायला सुरूवात
1 मार्चपासून बीड जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली होती. यामध्ये आजपर्यंत 2 लाख 77 हजार व्यक्तींच्या तपासण्या करण्यात आल्या. पहिल्या लाटेमध्ये 8 महिन्यात झालेल्या तपासण्यांची संख्या 2 लाख 9 हजार होती. यातून तब्बल 62 हजार 668 रुग्ण समोर आले. आता ही लाट काही प्रमाणात ओसरायला सुरुवात झाली आहे. मात्र, निष्काळजीपणा करून चालणार नाही. नागरिकांनी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन करण्यात येत आहे.
हेही वाचा -'तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना "निसर्ग" प्रमाणे देणार नुकसान भरपाई'