गेवराई - बीड जिल्ह्यासह गेवराई तालुक्यात कोरोनोच्या विषाणूने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि सामाजिक संस्थाकडून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी व रुग्णांना उपचार मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचप्रमाणे मुस्लीम धर्मगुरुंनी पुढाकार घेऊन दारुलूम येथे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या माध्यमातून धर्मगुरूंनी मानवतेचा संदेश देणारा स्तुत्य उपक्रम राबवला असल्याचे गौरवोद्गार आमदार लक्ष्मण पवार यांनी काढले.
दारुलुम येथील कोविड सेटंरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुफ्ती साहेब, तहसीलदार सचिन खाडे, वैद्यकीय अधिकक्षक डाॅ. चिचोले, तालुका अधिकारी कदम, इर्शाद फारोखी, हन्नान सेठ उपस्थित होते.
सर्व जाती धर्मांनी एकत्र यावे-
पुढे बोलताना आमदार पवार म्हणाले, महाराष्ट्रातसह बीड जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने आप आपली काळजी घेतली पाहिजे, आज निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व जाती धर्माने एकत्र येऊन आलेल्या संकटाचा सामना केला पाहिजे. हे संकट परतवून लावण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढले पाहिजे.
कोरोना महामारीने सध्या सर्वत्र थैमान घातले आहे, अशा गंभीर परस्थितीत रुग्णांना बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शन अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे गेवराईत वाढती कोरोनो रुग्णांची संख्या पाहाता, उपलब्ध सुविधा कमी पडत होत्या. हीच गरज ओळखून मुस्लीम धर्मगुरूंनी पुढाकार घेत हे कोव्हीड सेंटर सुरू केले आहे.
सध्या उपजिल्हा रुग्णालयात दोन कोविड सेंटर सुरू आहेत, तर नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात, व कस्तुरबागाधी शाळा येथे आणि गढी येथे असे 3 कोविड सेंटर सुरू केले होते. आता दारुलुम येथे नवीन कोविड सेंटर रविवारी सुरू करण्यात आले आहे.