बीड - जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 400 हून अधिक झाली आहे. कोरोनाची संसर्गाची साखळी तोडण्यासाठी बीड शहरातील व्यापाऱ्यांची अॅन्टीजेन टेस्ट घेण्यासाठी शनिवारी सुरुवात झाली. दिवसभरात 2 हजार 601 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी 86 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान बीड शहरातील सर्व व्यापाऱ्यांची अॅन्टीजेन टेस्ट घेण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. यावर शनिवारी बीड शहरात एकूण 6 केंद्रावरून तपासणी सुरु करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी 2 हजार 601 जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. यामध्ये 86 जण कोरोना संक्रमित असल्याचे उघडकीस आले.