महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 17, 2019, 10:35 PM IST

ETV Bharat / state

बीडमध्ये विसाव्या वर्षीच महिलांच्या गर्भ पिशव्यांच्या शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णालयावर कारवाईची टांगती तलवार

बीडमध्ये २० वर्षाच्या महिलांच्या गर्भ पिशव्या काढल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

नीलम गोऱ्हे

बीड -महिलांना गरज नसताना डॉक्टर त्यांना चुकीची माहिती देऊन त्यांच्या गर्भपिशवीवर शस्त्रक्रिया करत असल्याचे प्रकरण जिल्ह्यात समोर आले. त्यामुळे शासनाने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या एका समितीने आज बीड जिल्ह्यातील वंजारवाडी येथे भेट दिली आणि महिलांशी संवाद साधला. यावेळी चक्क २० वर्षाच्या महिलांच्या गर्भ पिशव्या काढल्याचा गंभीर प्रकार समिती समोर आला असल्याची माहिती समितीच्या प्रमुख नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

घटनेबाबत माहिती देताना नीलम गोऱ्हे

बीड शहरातील काही प्रमुख रुग्णालयांचा या चुकीच्या प्रकारांमध्ये समावेश आहे. आता या चुकीच्या गर्भपिशवी शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टरांवर कारवाईचा बडगा शासनाने उगारला आहे. विशेष म्हणजे बीड शहरातील काही गल्लाभरू रुग्णालयाची माहिती समितीने मागवली आहे. यावेळी समिती सदस्य विद्या चव्हाण आरोग्य सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात, सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले, अशोक तांगडे, सुशील कांबळे उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना डॉक्टर नीलम गोऱ्हे म्हणाल्या, बीड जिल्ह्यातील महिलांना उत्तम आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी निर्देश दिलेले आहेत. आरोग्य आस्थापना कायदा करण्यासाठी सकारात्मक विचार आम्ही करत आहोत. जेणेकरून खासगी आरोग्य सेवेमध्ये काही चुकीच्या बाबी होऊ नयेत आणि या चुकीच्या आरोग्य समस्यांना लगाम लागेल. असे सांगत त्या पुढे म्हणाल्या, बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या महिलांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य सेवा मुकादम आणि सामाजिक संस्था यांची मदत घेऊन एक नवीन नियमावली बनवणार आहोत. जर महिलेला गर्भपिशवी शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल तरच शस्त्रक्रिया केली जाईल. याशिवाय याबाबतची आरोग्यसेवा प्रत्येक शासकीय रुग्णालयात दिली जावी. याच बरोबर गर्भपिशवी शस्त्रक्रिया संदर्भातील सर्वे ३० जुलैपर्यंत पूर्ण करण्यात यावा. या मध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे २००८ मध्ये राबविलेली आयुर मंगलम् योजनेची सद्यस्थिती काय आहे. याची माहिती २५ जुलैपर्यंत बीडचे जिल्हाधिकारी यांनी समितीला सादर करावी, असेही निर्देश यावेळी गोऱ्हे यांनी दिले असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी त्यांनी ऊसतोड मजुरांच्या नोंदणीबाबत समिती सदस्यांनी सविस्तर चर्चा केली. ऊसतोड मजुरांच्या महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना देखील दिल्या असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details